अहिल्यानगर | नगर सह्याद्री
क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि. माध्यमातूनही अनेकांना फसविल्याप्रकरणी चेअरमन संदीप थोरातसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढत चालली असून आता ठेवीदारांनी आक्रमक पवित्रा घेत सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समितीने आंदोलनाचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे.
सह्याद्री मल्टीसिटी निधी लि. अहिल्यानगर या संस्थेचे चेअरमन संदीप थोरात व संचालक, मॅनेजर यांनी ठेवीदारांची फसवणूक करुन ठेवीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कृती समितीचे डॉ. श्रीधर दरेकर, संतोष लांडगे, प्रमोद साठे, समितीचे सदस्य, ठेवीदार उपस्थित होते.
डॉ. दरेकर म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून सह्याद्री मल्टीसिटी निधी लि. च्या माध्यमातून अहिल्यानगर तालुक्यासह अनेक ठिकाणी शाखा उघडून ठेवी जमा केल्या. ठेवींच्या मुदती संपल्या तरी आता ठेवी दिल्या जात नाहीत. हे ठेवीदारांचे लक्षा आले आहे. चेअरमन थोरात याने अनेकांची फसवणूक केली आहे.दरम्यानच्या काळात 10 टक्के 20 टक्के पैसे परत केले परंतु आता पैसे मिळत नाहीत.
त्यामुळे ठेवीदार हवालदील झाले आहेत. संचालक मंडळाने संघटितपणे गुन्हा केला आहे. त्याच्यावर संघटीत गुन्हेगारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत असे सह्याद्री ठेवीदार बचाव कृती समितीचे समन्वयक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेल्या ठेवीदारांची यादी दिली.