‘आरोग्यदूत’च्या जाहीरातीतून बेरोजगारांकडून उकळले साडे सहा कोटी | मयत सचिन साबळेच्या नावाचा दुसऱ्यांदा केला गैरवापर
स्पेशल रिपोर्ट | शिवाजी शिर्के
मनी लॉड्रींगसाठी थेट पश्चिम बंगाल गाठले अन् विघ्नहर होल्डींग्ज कंपनी दाखवल्यानंतर या कंपनीत डायरेक्टर म्हणून ज्यांना घेतले त्यांनाच संदीप थोरात याने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याशिवाय आगमन या कंपनीत संचालक म्हणून दाखविण्यात आलेल्या सचिन साबळे याचे अपघाती निधन झाले असतानाही त्याला आगमन या कंपनीत संचालक दाखविण्यात आले. आगमनच्या माध्यमातून जोरदार गंडवागंडवी चालू असतानाच याच संदीप थोरात याने मृत असलेल्या संदीप साबळे याला आरोग्यदूत या दुसऱ्या कंपनीत संचालक दाखवले. आरोग्यदूतच्या माध्यमातून देशभरात आरोग्यसेवक नियुक्त करण्याची जाहीरात दिली. त्या जाहीरातीसाठी अर्ज करणाऱ्यांकडून 950 रुपये प्रत्येकी घेण्यात आले. राज्यातील प्रत्येक गाव, शहरातील प्रत्येक वार्डात असे सेवक नियुक्त करण्यात येणार असल्याचे भासवले. त्यासाठी राज्याचाच विचार केला तर 36 जिल्ह्यांमधून किमान दोन हजार अर्ज आले असे गृहीत धरले तर संदीप थोरात याच्या खात्यावर बेरोजगार युवकांचे 6 कोटी 40 लाख रुपये जमा झाले असणार! मृत असलेल्या सचिन साबळे याचा या आरोग्यदूत कंपनीच्या जाहीरातीसाठी वापर केला असून संदीप थोरात नामानिराळा असल्याचे दिसून येते. अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार समोर आला आहे. तीन महिन्यांत दामदुप्पट, दाम तिप्पट व महिन्याला 10 ते 12 टक्के जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या विविध कंपन्यांचे नेटवर्क उभे करण्याच्या लालसेत पारंगत ठरलेल्या संदीप थोरात याने त्याच्याच सह्याद्री मल्टिनीधी कंपनीत कर्मचारी राहिलेल्या सचिन साबळे याला ‘आगमन’ या दुसऱ्या कंपनीत संचालक दाखवल्याचे धक्कादायक समोर आले आहे. वास्तविक सचिन साबळे याचा सहा महिन्यांपूवच एका अपघातात मृत्यू झाला. त्याच सचिन साबळे याला आरोग्यदूत या कंपनीत संचालक दाखवून त्याच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रकार आजही संदीप थोरात याच्याकडून चालू आहे.
सचिन साबळे अन् प्रसाद साबळे दोघांचाही मृत्यू संशयास्पद!
प्रसाद साबळे आणि संदीप थोरात हे दोघेही क्लासीकब्रीज ही कंपनी चालवायचे! त्यानंतर संदीप थोरात बाहेर पडला आणि त्याने सह्याद्री मल्टीनिधी ही कंपनी चालू केली. प्रसाद साबळे हा इन नगर ही कंपनी देखील चालवयचा! यानंतर त्याने इन नगर ही कंपनी सुहास व देवीदास रायकर यांना विकली. यानंतर प्रसाद साबळे हा सह्याद्री मल्टिनीधी मध्ये कामाला आला. यानंतर संदीप थोरात आणि प्रसाद साबळे यांच्यात वाद झाले आणि त्याला कामावरुन काढले. त्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद साबळे याची संभाजीनगर रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलमागील एका विहीरीत डेडबॉडी सापडली. साबळे, रायकर आणि संदीप या तिघांना त्या रात्री इंद्रायणी हॉटेलकडे जाताना अनेकांनी पाहिले होते. मात्र, डेडबॉडी सापडल्यानंतर याबाबत काहीच तपास झाला नाही. यानंतर सचिन साबळे हा प्रसादच्या जागी कामाला आला. हे दोघे एकमेकांचे नातेवाईक नव्हते. सचिन साबळे हा ऑनधीस टाईम मिडीया या संदीप थोरातच्याच एका दुसऱ्या कंपनीत अकाऊंटस काम पाहत होता. सचिन कर्मचारी असल्याने त्याची सर्व कागदपत्रे संदीप थोरातकडे होतीच! दि. 19 ऑगस्ट 2024 रोजीच्या रात्री सचिन साबळे याचा अपघात झाला आणि त्या अपघातात सचिन साबळे हा जागीच मयत झाला. हे दोघेही संदीप थोरात सोबत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संचालक राहिले. त्या दोघांचा मृत्यू आजही एक गुढ आहे. संदीप थोरात याच्याभोवती या दोघांच्याही मृत्यूची वावटळ येऊन थांबत आहे. या दोन्ही प्रकरणांच्या तपासाची फाईल पुन्हा उघडल्यास अत्यंत धक्कादायक बाब समोर येऊ शकते.
बेरेोजगारांना असा घातला संदीप थोरातने गंडा!
संदीप थोरात याने आरोग्यदूत वेलफेअर फौंडेशन ही नवीदिल्लीतील संस्था असल्याचे दाखवले. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील गावागावांमध्ये आणि शहरातील प्रत्येक वार्डात आरोग्यदूत नियुक्त करण्यात येणार असल्याची जाहीरात संपूर्ण देशातील सोशल मिडियात दिली. याशिवाय काही वर्तमानपत्रांमध्येही ती प्रसिद्ध करण्यात आली. 12 हजार 500 रुपये पगार आणि विम्याचे संरक्षण असे अमिष त्यात दाखवले गेले. जाहीरातीच्या शेवटी अर्ज करणाऱ्यांनी कोटक बँकेच्या क्यु आर कोडला स्कॅन करुन 950 रुपये भरण्याचे सांगितले.
जनतेचे पैसे लुटता लुटता बेरोजगार तरुणही लुटले!
सह्याद्री मल्टिनिधीच्या नावाखाली अनेकांना गंडा घालता घालता संदीप थोरात याने वाढती बेरोजगारी हेरली. बेरोजगार तरुण कोणत्याही जाहीरातीसाठी अर्ज करत असल्याचे हेरले. 950 रुपये ही फार मोठी रक्कम नसल्याचे हेरुन त्याने गावातल्या गावात साडेबारा हजार पगार देणारी नोकरी मिळत असल्याचे पाहून अनेक तरुण आकषत होणार हेही हेरले. सोशल मिडियासह अन्य प्लॅटफॉर्मचा वापर त्याने सदर जाहीरातीसाठी केला. दिलेल्या वेब साईटवर अर्ज भरून अर्जाखाली दिलेल्या लिंक / क्यू आर कोड स्कॅन करून परीक्षा शुल्क भरण्याचे आवाहन केले. तसेच परीक्षा शुल्क भरल्याचा पुरावा म्हणून अर्जा खाली दिलेल्या रकाण्यात युटीआर नंबर टाकण्यास सांगितले. कोणालाही कोणतीही शंका येणार नाही अशी पद्धत त्याने वापरली आणि राज्यभरातील हजारो तरुणांना गंडा घातला.
गंडविण्यासाठी कोटक बँक अन् दिल्लीची केली निवड!
आरोग्यदूत वेलफेअर फाऊंडेशन हे निमसरकारी कार्यालय असल्याचे भासवताना संदीप थोरात याने हुशारी केली. बँक निवडताना त्याने कोटक बँक निवडली. याच बँकेत त्याने अर्जदारांना ऑनलाईन 950 रुपये भरण्याचे आवाहन केले. आरोग्य दूतचे कार्यालय दिल्लीस्थित असल्याचे भासवले. त्यासाठी त्याने ‘आरोग्यदूत वेलफेअर फाऊंडेशन, घर क्रमांक 3246, 2 रा मजला ,रंजीत नगर, पटेल नगर पश्चिम, मध्य दिल्ली, नवी दिल्ली, दिल्ली, भारत, 110008’ असा पत्ताही जाहीर केला. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तसेच प्रत्येक नगरपरिषद, महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मानधन तत्त्वावर आरोग्यदूत नेमणे आहे, अशी जाहीरात त्याने राज्यभरात प्रसिद्ध केली.
आरोग्यदूतांना दाखवले आरोग्य जागृती अन् सुविधांचे गाजर!
आरोग्यदूत वेल्फेअर फाउंडेशन,नवी दिल्ली या सामाजिक संस्थेकडून महाराष्ट्रात आरोग्यदुतची नेमणूक करावयची असल्याचे दाखवताना ग्रामीण आणि शहरी लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि काही सुविधा उपलब्ध करून देणे हे आरोग्यदुताचे काम असणार असल्याचेही त्याने त्या जाहीरातीत नमूद केले. उमेदवारांना हे काम आपल्या गावात किंवा वॉर्डात करायचे आहे. यासाठी आरोग्यदुतास संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाईल, असेही जाहीर करण्यात आले होते.
दहावी शिक्षणाची अट, महिलांसाठी 33 टक्के आरक्षण अन् बरेच काही!
आरोग्यदूत साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण किमान दहावी पास, त्याचे वय 18 ते 50 वर्षे, महिलांंसाठी 33 टक्के राखीव जागा, स्वतःची दुचाकी व मोबाईल फोन आवश्यक, आरोग्यदूतास त्याचे गाव किंवा वार्डमध्येच काम करावे लागणार, साडेबारा हजार प्रतिमहिना मानधन, विमा संरक्षण असे अमीष दाखवणारी ही जाहीरात होती. गावातच नोकरी मिळणार असल्याने एकाएका गावातून दहा- वीस अर्ज केले. फक्त 950 रुपयांमध्ये हे सारे मिळत असल्याने अनेकांनी अर्ज करण्यास उड्या मारल्या आणि संदीप थोरात मालामाल झाला!
आरोग्यदूत साठी ऑनलाईन मागविले अर्ज!
आरोग्यदूत साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024 असल्याचे जाहीर करण्यात आले होते. याशिवाय अधिक माहितीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी आमच्या https://arogyadut.org/ अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्याचे सांगण्यात आले. फॉर्म सबमिट करताना काही अडचण आल्यास arogyadutwelfarefoundationgmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा असेही सांगण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तसेच प्रत्येक नगरपरिषद, महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मानधन तत्त्वावर आरोग्यदूत यातून नियुक्त केले जातील असेही सांगण्यात आले.
30 जून 2025 रोजी होणार परीक्षा अन् त्यानंतर 180 दिवसांनी होणार नियुक्ती!
जाहीरातीनुसार ज्या उमेदवारांनी ‘आरोग्यदूत’ पदासाठी अर्ज भरून परीक्षा शुल्क जमा केलेले आहेत अश्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा 30 जून 2025 रोजी घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना त्यांच्या संबंधित गावातील नागरिकांना सेवा देण्यासाठी नियुक्त केले जाईल. निवडलेल्या उमेदवारांसाठी 12 हजार 500 रुपये मासिक वेतन तसेच 10 लाख रुपये रकमेचा अपघात विमा विनामूल्य देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण आणि नियुक्ती ही परीक्षेनंतर 180 दिवसांनी मिळेल असेही सांगण्यात आले आहे. परीक्षा ऑनलाईन होणार म्हणजे नक्की कशी होणार आणि नियुक्ती कशी होणार हे पाहण्यासाठी आता 30 जूनची वाट पहावी लागणार आहे.
950 रुपयांच्या फंड्याने मिळवून दिले किमान साडेसहा कोटी!
आरोग्यदूत साठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकाकडून 950 रुपये कोटक बँकेच्या खात्यावर घेण्यात आले. राज्यातील प्रत्येक गावात या नियुक्त्या दिल्या जाणार असल्याने राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधून अर्ज केले गेले. पालिका आणि महापालिका हद्दीतील प्रत्येक वार्डातही नियुक्त्या दिल्या जाणार असल्याने तेथून देखील अर्ज आले. 36 जिल्ह्यांचा विचार करता एका जिल्ह्यातून किमान दोन हजार अर्ज आले असे गृहीत धरले तर 36 जिल्ह्यांचे मिळून 72 हजार अर्ज होतात. 72 हजार अर्जाचे प्रत्येकी 950 रुपये याप्रमाणे 6 कोटी 84 लाख रुपये संदीप थोरात याने मिळवले. काहीही न करता फक्त ऑनलाईन अर्ज आणि नोकरीचे अमिष दाखवत संदीप थोरात याने साडेसहा कोटींना बेरोजगारांना गंडवले हे स्पष्टपणे समोर आले आहे.
जाहीरात स्प्रेड करणाऱ्या पोर्टलवर कारवाई होणार का?
आरोग्यदूत नियुक्त करण्याच्या जाहीराती अत्यंत हुशारी वापरत संदीप थोरात याने I love nagar, Spredit it , In nagar यासारख्या पोर्टलवर टाकल्या. त्यावर विश्वास ठेवत बेरोजगार तरुणांनी अर्ज केले. हे सारेच बोगस असल्याचे आता समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात संदीप थोरात याच्या भामटेपणास त्याची जाहीरात पसरवणारे पोर्टल देखील जबाबदार असल्याचे त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची मागणी पुढे आली आहे.
चहावाल्या दिपक कराळेने दिला पोलिस अधीक्षकांना खुलासा!
पुण्यात चहाचे दुकान असणाऱ्या दिपक कराळे आणि संदीप थोरात हे शेजारच्या गावचे! दोघांची ओळख असल्याने दिपक कराळे याची कादगपत्रे वापरत त्याला क्लासीकब्रीज या कंपनीत संचालक केल्याचे दाखवले. संदीप थोरात याने त्याचे नाव सदर कंपनीत हटविल्याचे लक्षात येताच दिपक कराळे सावध झाला. आपण संदीप थोरात याच्याकडून फसवले जात असल्याचे येताच दिपक कराळे याने काल दि. 17 फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली आणि संदीप थोरात याने त्याची कशी फसवणूक केली याबाबत खुलासा केला. माझी परवानगी न घेता त्याने मला कंपनीत संचालक केल्याचे लक्षात आल्यानंतर मी कायदेशिर सल्ला घेतला आणि माझा राजीनामा मी दि. 24 जून2024 रोजी आरओसीच्या पुणे कार्यालयास मेलद्वारे सादर केला, असे त्याने पोलिस अधीक्षकांकडे लेखी दिले. तसेच सदर कंपनीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे लेखी देतानाच याबाबतच्या गैरप्रकारास संदीप थोरात हाच जबाबदार असल्याचेही त्यात म्हटले आहे.
पत्ता फक्त कोलकत्याचा, कारभार नगरमधूनच!
पश्चिम बंगालमधील कोलकत्याची आरओसी नोंदणी दाखवत संदीप थोरात याने कोलकत्ता शहरात विघ्नहर होल्डींग्ज प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. या कंपनीचे कोलकत्यात कार्यालय दाखवले. मात्र, प्रत्यक्षात सर्व कारभार नगरमधूनच केला. सदर कंपनीत संचालक म्हणून एक उच्च शिक्षीत महिला घेतली. चारच दिवसात त्या महिलेने आपला संचालकपदाचा राजीनामा दिला. मात्र, संदीप थोरात याने बाहेर तसे समजूच दिले नाही. दि. 17 फेब्रुवारी 1995 रोजी कंपनीची नोंदणी झाल्यानंतर दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे. सात वर्षात या कंपनीच्या नावाने त्याने अनेकांना गंडा घातल्याची शंका आता साऱ्यांनाच येऊ लागली आहे.