भ्रष्ट पोलिसांच्या आश्रयाने गुन्हेगार बिनधास्त! वाळू तस्करीच्या वादात युवकाला मारहाण, फक्त एकाला अटक; पोलिसांची निष्क्रियता संशयास्पद, जनतेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष
पारनेर । नगर सहयाद्री
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर परिसर गुन्हेगारीच्या काळ्या विळख्यात सापडला आहे. अवैध धंदे, वाळू तस्करी आणि दारू विक्रीने कळस गाठला असून, स्थानिक पोलीस यंत्रणा सर्व काही डोळेझाक करून नव्हे, तर थेट गुन्हेगारांना पाठीशी घालून त्यांच्या काळ्या कारवायांना खतपाणी घालत आहे. समाजाचे रक्षक म्हणवणारे पोलीस खरेच गुन्हेगारांचे साथीदार आहेत का? त्यांना गुन्हेगारांच्या काळ्या पैशाची नशा चढली आहे का? असा थेट सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
नगर-कल्याण महामार्गावर वसलेले टाकळी ढोकेश्वर हे मोठे बाजारपेठेचे केंद्र आहे. जवळपास 40 गावांचा संपर्क इथे असतो. येथे शाळा, महाविद्यालये आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. गुन्हेगारीने या परिसराला विळखा घातला आहे. वाळू तस्करीचे ट्रॅक्टर आणि ट्रक रात्रीच्या अंधारात बिनधास्त फिरतात. दारू विक्रीचे अड्डे ठिकठिकाणी थाटलेले आहेत. हे सर्व काही पोलिसांच्या आशीर्वादाने चालते. माध्यमांमधून आवाज उठवला तरी पोलीस आणि महसूल प्रशासन झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. हे निष्काळजी अधिकारी गुन्हेगारांच्या पगारीवर चालतात का? स्थानिकांच्या चर्चेनुसार, पोलीस गुन्हेगारांसोबत पार्टनरशीपमध्ये आहेत, अशी स्थिती आहे. हा भ्रष्टाचाराचा कळस आहे, जिथे कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक झाले आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गुन्हेगारांना पोलिसांचे संरक्षण मिळत असल्याने त्यांचे मनोधैर्य गगनाला भिडले आहे. दिवसाढवळ्या व रात्री वाळू तस्करीसाठी वाहने धडधडत फिरतात, दारूचे अड्डे उघडेच असतात. यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण पोलिसांकडून कारवाईचा नाममात्र देखावाही नाही. उलट, गुन्हेगारांवर नरमाई दाखवली जाते. हे कशाचे लक्षण आहे? पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात, मग सामान्य माणूस कुणाकडे न्याय मागणार? हा थेट हातमिळवणीचा पुरावा आहे, जिथे पोलिसांच्या भ्रष्ट हातांनी गुन्हेगारीला पंख फुटले आहेत.
या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे सर्व घडते ते पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे! स्थानिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, कठोर कारवाईची मागणी केली, पण तरीही शांतता. हे पोलीस प्रशासन कधी स्वच्छ होणार? जोपर्यंत हे भ्रष्ट अधिकारी पदावरून हटविले जात नाहीत, आणि पारदश कारवाई होत नाही, तोपर्यंत टाकळी ढोकेश्वर परिसराला संरक्षण मिळेल का? पोलीस प्रशासन गुन्हेगारांचे साथीदार असल्याचा आरोप आता सिद्ध होत आहे. नागरिकांना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवणे गरजेचे आहे. भ्रष्ट यंत्रणा उखडून फेकण्याची वेळ आली आहे. अन्यथा, गुन्हेगारीचा हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये अनेक गुन्हे घडत असतात. त्यामध्ये खरे गुन्हे लपविण्यासाठी पोलीस प्रशासन लाच घेते आणि खोटे गुन्हे दाखल करून सर्वसामान्यांना त्रास देत आहे आसा ग्रामस्थांचा आरोप आहे. सर्वसामान्य व्यक्ती जर पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल करण्यासाठी गेली तर त्यांच्याकडून लाच मागितली जाते हे मोठं दुर्दैव आहे. काही पोलीस अधिकारी हे भ्रष्ट आणि कीड लागलेले आहेत हे दुर्दैव आहे.
भ्रष्ट पोलीस अधिकारी गुन्हेगारांचे मित्र
पारनेर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या टाकळी ढोकेश्वरमध्ये पोलीस अधिकारी हे गुन्हेगारांना अश्रय देतात. गुन्हेगार हे जसे त्यांचे भाऊ आणि मित्रच आहेत, अशा पद्धतीची वागणूक पोलिसांकडूनच गुन्हेगारांना दिली जात आहे. ही मोठी शोकांतिका असून त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींवरच गुन्हेगारांचा वचक निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासन हे गुन्हेगारांच्या हातातील बाहुले झाले आहेत का? या सर्व प्रकाराला कोणाचा राजाश्रय आहे हे पण पुढे येणे गरजेचे आहे.
वासुंदेतील प्रकार : गुन्हेगारीला राजाश्रय?
वासुंदे येथे घडलेला प्रकार हा गुन्हेगारीला राजाश्रय मिळत असल्याचाच पुरावा आहे. दोन दिवसांपूव वाळू तस्करीच्या वादातून एका युवकाला टाकळी ढोकेश्वर परिसरातील गुंडांनी बेदम मारहाण केली. या गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांनी उघडपणे दहशत माजवली. तरी फक्त एकाला अटक झाली, बाकीचे सर्रास मोकाट फिरत आहेत. पोलीस प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेऊन निष्क्रिय आहे. जणू काही हे गुन्हेगार त्यांना माहीतच नाहीत. टाकळी ढोकेश्वर परिसरात गुन्हेगारी बोकाळली असताना पोलिसांचे हे उदासीन वर्तन संशयास्पद आहे. वाळू तस्करीसारख्या बेकायदा धंद्यांना कोणाचा आश्रय आहे? सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे पोलीस का दुर्लक्ष करत आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत. गुन्हेगारांना पाठीशी घालणारी ही व्यवस्था बदलली नाही, तर सामान्य माणसाचे जगणे असुरक्षित होईल. तातडीने कठोर कारवाई करून गुन्हेगारीला आळा घालावा, अन्यथा जनतेचा रोष अटळ आहे.
अधिकाऱ्यांचा हप्तेखोरीत सहभाग
तालुक्याच्या उत्तर भागात मुळा व मांडओहळ नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे. देसवडे, मांडवे, पळशी, वनकुटे, वासुंदे परिसरात हा गैरप्रकार जोरात चालत आहे. चार प्रशासकीय अधिकारी होमगार्डच्या माध्यमातून हप्ते गोळा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘नगर सह्याद्री’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले, तरी तस्करांवर व प्रशासनावर कोणताही परिणाम झालेला नाही. वाळू तस्करीमुळे नदीपात्रांचे नुकसान होत असून, टाकळी ढोकेश्वर परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. पर्यावरण सुद्धा धोक्यात आहे.
गुन्हेगारांच्या सांगण्यावरून ॲट्रॉसिटीचे गुन्हे
वासुंदे येथील युवकाला मारहाण झाली. हा वाद मिटवण्यासाठी वासुंदे येथील काही ग्रामस्थ गेले असता वाळू तस्करी करणारे व परिसरात दहशत माजवणारे आणि युवकाला मारहाण करणारे जे गुन्हेगार आहेत व त्या अटक असलेल्या गुन्हेगारांच्या सांगण्यावरूनच भ्रष्ट पोलीस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी वासुंदे येथील युवकांवर ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले. आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवकांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतविले आहे.
दंडगव्हाणे यांचे घनिष्ठ संबंध
पारनेर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत टाकळी ढोकेश्वर चौकीत प्रमुख अधिकारी असणाऱ्या दंडगव्हाणे यांचे अल्पावधीत या परिसरातील गुन्हेगारी वतुर्ळाशी घनिष्ट आणि तितकेच नाजूक संबंध आले. त्यातून या टोळ्या मोकाट सुटल्या असल्याचा जाहीर आरोप परिसरातून होत आहे. या अधिकाऱ्याची तातडीने पारनेर मधून बदली करावी अन्यथा जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.