नेवासा । नगर सहयाद्री :-
गोधेगाव (ता. नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर विशेष पोलीस पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत 75 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोधेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून काहीजण जेसीबीच्या सहाय्याने परवाना नसताना वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून 25 जून रोजी खाडे यांनी पंचांसह पथकास घेऊन छापा टाकला. कारवाई दरम्यान जेसीबीने वाळू उपसा व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत वाळू भरण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी अचानक धाड टाकली. काही आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. मात्र, प्रवीण नामदेव शेटके (नेवासा खुर्द), विशाल दत्तात्रय ठोंबरे आणि अभिषेक भिमराज जावळे (दोघे रा. गोधेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
पळून गेलेल्या आरोपींमध्ये राजेंद्र गोलांडे, दिलीप शेलार, कृष्णा पुनमसिंग परदेशी, कल्याण उन्हाळे, काका पठारे आणि एका कुबोटा ट्रॅक्टर चालकाचा समावेश आहे. या कारवाईत जेसीबी, पाच ट्रॅक्टर-ट्रॉली, एक कुबोटा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि अंदाजे 5 ब्रास वाळू असा एकूण 75 लाख 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.