अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शेतकरी कर्जमाफी, उस, कांदा, कापूस व दुध दर, मराठा व इतर आरक्षण, निवडणूका बॅलेट पेपरवर घेणे आणि अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकर्यांच्या सन्मानार्थ हेटरी ५० हजार नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करून द्यावी आदिसह विविध मागण्यांचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजेश परकाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी दरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन जनतेला दिले होते. ऊस, कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व मराठा, धनगर व इतर जात समूहाचे आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे जनतेला आश्वाशित केले होते. आपण सत्तेवर आलात व मुख्यमंत्री झालात मात्र या गंभिर विषयांबाबत आपण चालढकल करत आहात असा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी निवेदनाद्वारे केला आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी अत्यंत कठिण परस्थितीत असून कर्जबाजारी झाला आहे. महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत.
महाराष्ट्रात मराठा, धनगर व इतर काही जात समूह आरक्षणाची मागणी करत असून याबाबत समाजबांधव अत्यंत आक्रमक असून त्यांच्या भावनाही अत्यंत तिव्र आहेत. आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा. उसाला सहकारी अथवा खाजगी कारखानदार एफ आर पी प्रमाणे दर देत नाही, तत्काळ पेमेंट देत नाहीत. तसेच कारखान्यावरील वजन काटे सदोष आहेत. महाराष्ट्रात कडक कायदा करून उसाला एफ आर पी प्रमाणे दर देऊन सात दिवसांत पेमेंट देण्याचे आदेशित करावे. प्रत्येक कारखान्याचा वजन काटा पारदर्शक असावा याबाबत कायदा करावा.दुध भेसळीबाबत कठोर पावले उचलावीत. भेसळ बंद करून दुधाला ७० रुपये दर जाहीर करावा.
राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्याचे प्रचंड नुकसान झाले असल्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट हेटरी ५०,००० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी तसेच कांदा, सोयाबीन, कापूस व इतर शेतमाला बाबत तत्काळ उत्पादन खर्चाचा विचार करून हमीभाव जाहीर करून शेतकर्यांना दिलासा द्यावा. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर वरच घेण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांकडे संभाजी ब्रिगेडने लक्ष वेधले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्री शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम कोरडे, जिल्हा महासचिव निलेश बोरुडे, शाम जरे, अरविंद गेरंगे, लक्ष्मण गायके, राजू काटकर, सोमनाथ गोपाळे, आदिनाथ काळे, शरद जोशी, अभी मेढे,अच्युत गाडे, विठ्ठल देठे, सचिन काकडे, महेश दानवे, संतोष कोकाटे, घनश्याम काळे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.