Crime News; राखीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना झाशी जिल्ह्यातील गरौठा भागात समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच एका भावाने आपल्या १८ वर्षीय बहिणीची गळा आवळून निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
मृत तरुणीचे नाव कुमारी सहोदर ऊर्फ पुत्ती (१८) असून, तिचे विशाल (१९) नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी चार महिन्यांपूर्वी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन लग्न केलं होतं. काही दिवसांनी नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही कुटुंबांमध्ये समेट झाला आणि त्यांचं नातं स्वीकारण्यात आलं. मात्र, पुत्तीचा भाऊ अरविंद हा या निर्णयाने संतप्त होता.
नोकरीच्या नावाखाली प्रियकराची हत्या
७ ऑगस्ट रोजी अरविंद आणि त्याचा साथीदार प्रकाश प्रजापती यांनी विशालला नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवत गावाबाहेर नेलं. त्याठिकाणी त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर विशालच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचाही केला खून
विशालची हत्या झाल्यानंतरही अरविंदचा संताप शमला नाही. त्यानं रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीचा गळा आवळून खून केला. रविवारी सकाळी चंद्रपुरा गावातील दादा महाराज प्लॅटफॉर्मजवळ पुत्तीचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, तिचं टक्कल केल्याचं देखील पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.
पोलिसांनी घेतली आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या घटनेनंतर पोलिसांनी जलद कारवाई करत अरविंद आणि प्रकाश प्रजापतीला अटक केली आहे. सध्या दोघांवरही गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.



