अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या फसवणूक प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून त्यांनी संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात (वय 35 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) व दरेवाडी (ता. अहिल्यानगर) शाखेचा मॅनेजर दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय 35 रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांना अटक केली आहे.
दरम्यान, त्यांना गुरूवारी (14 ऑगस्ट) न्यायालयासमोर हजार करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची (19 ऑगस्टपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमनसह 13 व्यक्तींनी मिळून 18 जणांची सुमारे 66 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रमोद राजेंद्र साठे (वय 41, रा. नारायणडोहो, ता. अहिल्यानगर) यांनी 9 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात आतापर्यंत 160 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले असून फसवणूकीचा आकडा 3 कोटी 83 लाख 55 हजार 496 रूपयांवर गेला आहे. चेअरमन थोरात व मॅनेजर कोरडे यांना शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (13 ऑगस्ट) ताब्यात घेत अटक केली व गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
160 गुंतवणूकदारांचे 3.83 कोटी रूपये अडकले
भिंगार पोलीस ठाण्यात 9 जून रोजी फिर्याद दाखल झाली त्यावेळी 18 व्यक्तींची 66 लाख रूपये फसवणूक झाल्याचा त्यामध्ये उल्लेख होता. मात्र, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासकामी वर्ग करण्यात आला. त्यांनी 160 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून घेतले. यामुळे फसवणूकीची रक्कम वाढली असून ती 3 कोटी 83 लाख 55 हजार 496 रूपये झाली आहे. अजून देखील संस्थेच्या विविध शाखेतील गुंतवणूकदारांनी फसवणूकीसंदर्भातील कागदपत्रे घेऊन आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.