अयोध्या | नगर सह्याद्री
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आता आज सन्मानाने मंदिरावर धर्मध्वज फडकला. कोविदार वृक्ष, तेजस्वी सूर्याची प्रतिमा चिन्हांकीत झालेला भव्य ध्वज विधीवत पूजन करून फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी आणि सरसंघचालकांनी एकत्र श्रीरामाचं पूजन करून ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणासाठी हजारो भाविक अयोध्येत जमले होते, प्रभू श्रीरामाचा जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या साथीने मंदिरावर भव्य भगव्या रंगाचा धर्मध्वज फडकला.
राम मंदिराचा हा धर्मध्वज मंत्रघोषांच्या उच्चारात बटन दाबताच कळसाच्या दिशेने वर जाऊ लागला. हवेचा प्रचंड जोर असतानाही हा धर्मध्वज 191 फूट उंचावर असलेल्या राम मंदिराच्या कळसावर अचूकपणे जाऊन स्थिरावला. पंतप्रधान मोदी आणि उपस्थित जनसमुदाय खाली उभे राहून डोळ्यांमध्ये हे दृश्य साठवत होता. मात्र, धर्मध्वज मंदिराच्या कळसावर स्थिरावला तेव्हा पंतप्रधान मोदी यांचे मन दैवी भावनांच्या संचाराने अक्षरश: सद्गतित झाले. धर्मध्वज मंदिराच्या कळसावर पोहोचला तेव्हा खाली उभ्या असलेल्या नरेंद्र मोदींचे जोडलेले हात भावना आवेगाने थरथरताना दिसले. हे दृश्य पाहून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
हा धर्मध्वज या प्रेरणेचे प्रतिक असेल नरेंद्र मोदी
सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. सत्य हेच ब्रह्मस्वरुप आहे, सत्य हाच धर्म आहे. ’प्राण जाये पर वचन न जाये’, हा संदेश राम मंदिरावरील हा धर्मध्वज देईल, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे, ज्याठिकाणी गरीबी नसेल, कोणी दु:खी किंवा लाचार नसेल, तिकडे कोणताही भेदभाव किंवा समस्या नसतील. हा धर्मध्वज या प्रेरणेचे प्रतिक असेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
रामध्वजाचं वैशिष्ट्ये काय?
161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीची रामध्वज.
रामध्वज जमिनीपासून 191 फूट उंचीची आहे.
रामध्वज केशरी रंगाची, 11 फूट रुंद आणि 22 फूट लांब.
बटन दाबताच रामध्वजा दोरीवरुन वरच्या टोकाला पोहचून ध्वज फडकला.
असे बनले राम मंदिर
9 नोव्हेंबर 2019- राम मंदिर निर्माणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी, ट्रस्टद्वारे बांधकामाचे आदेश
5 फेब्रुवारी 2020- श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची घोषणा
5 ऑगस्ट 2020- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिराचे भूमीपूजन
20 ऑगस्ट 2020- राममंदिराचे काम प्रत्यक्षात सुरू
22 जानेवारी 2024- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिरात राममूतची प्रतिष्ठापना
5 जून 2025- राम मंदिराच्या दरबारात अन्य सात देवी देवतांच्या मूतची प्रतिष्ठापना
25 नोव्हेंबर 2025- मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण



