अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
जुन्या बोल्हेगाव रस्त्यावरून घरी जात असताना सावेडी परिसरातील एका तरूणावर तीन जणांनी कोयता, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दत्ता बबन वाघचौरे (वय 38, रा. आरोह कॉलनी, सावेडी) हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघचौरे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (23 ऑगस्ट) रात्री 10.30 वाजता वाघचौरे हे दुचाकीवरून जुन्या बोल्हेगाव रस्त्याने जात असताना एकनाथ सोनवणे व त्याची दोन मुले यांनी त्यांना अडवले. तू आम्हाला पाहून शिवी का दिलीस? असा जाब विचारून या तिघांनी वाघचौरे यांना मारहाण केली. वाद चिघळताच एकनाथ सोनवणे घरातून कोयता आणून वाघचौरे यांच्यावर वार केला. त्याच्या एका मुलाने लोखंडी रॉडने वार केले, तर दुसर्या मुलाने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
या हल्ल्यात वाघचौरे जखमी झाले असून घटनेनंतर उपस्थित नागरिकाने जखमी वाघचौरे यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाघचौरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात, एकनाथ सोनवणे व त्याची दोन मुले यांनी मारहाण केली असल्याचे नमूद केल्याने तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रमेश शिंदे अधिक तपास करीत आहेत.