अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अवजड वाहतुकीच्या हप्तेखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ओव्हरलोड सिमेंट वाहतूक करणार्या ट्रकचालकाकडून तीन हजार रुपयांची लाच घेताना मोटार वाहन निरीक्षक गीता भास्कर शेजवळ (वय ४४) आणि खाजगी इसम इस्माईल पठाण (वय ४३) यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. २४) दुपारी चांदणी चौक परिसरात करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका ६५ वर्षीय तक्रारदाराला ओव्हरलोड सिमेंटचा ट्रक अहिल्यानगर हद्दीतून घेऊन जायचा होता. यासाठी त्यांनी आरटीओ कार्यालयात संपर्क साधला असता, मोटार वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि त्यांचा खाजगी हस्तक इस्माईल पठाण यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी आरटीओ कार्यालयासमोर सापळा रचला. यावेळी शेजवळ यांच्या सांगण्यावरून इस्माईल पठाण याने तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर पथकाने गीता शेजवळ यांनाही ताब्यात घेतले. या दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी शेजवळ यांच्या कार्यपद्धतीवर आणि अवजड वाहतुकीतील भ्रष्टाचारावर आवाज उठवला होता. त्यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रारही केली होती, मात्र त्यानंतरही हा प्रकार सुरूच होता, हे या कारवाईने स्पष्ट झाले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या पथकाने केली.