कर्जत / नगर सह्याद्री :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जामखेड दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये रोहित पवार मित्र परिवाराकडून अजित पवार यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरबाजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या वारंवार कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होत असतानाच दुसरीकडे रोहित पवारांच्या नावे अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जामखेडमध्ये नेमकं घडतंय काय? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर येत आहे. रोहित पवारांच्या मतदारसंघात जाहीर कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांच्यावतीने शिव शाहू फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे गुरुवारी (दि. १७) जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याजोडीला राम शिंदे, विखे-पाटलांचीही हजेरी राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेवरून दिसत आहेत.
दरम्यान, अजित पवार जामखेड मध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताचे अनेक बॅनर लागले आहेत. त्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मित्र परिवार अशा नावाने अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लागले आहेत. तसेच बॅनरवर रोहित पवार यांचा फोटो आणि उल्लेख आहे. कर्जत-जामखेडच्या पावन भूमीत स्वागत, आशा आशयाचे बॅनर लावले आहेत.