बाप्पा गणेशा म्हणतोय, ‘जैन धर्मीयांची क्षमापना समजून घेण्याची गरज; काही चुकलं असंच वाटत असेल तर ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणून मलाही माफ करा’!
दिवसाला १५ कुत्री! आतापर्यंत १३ हजार म्हणजेच ८६५ दिवस पकडली कुत्री! म्हणजेच अडीच वर्षे चालले काम! आयुक्तसाहेब, आवरा तुमची ‘खात्या घरची टीम’!
मोरया रे…. / शिवाजी शिर्के
मास्तरांची बँक आणि त्याआधी क्षमापनाच्या मुद्यावर कालच्या भेटीत बाप्पा जरा जास्तच गंभीर बोलला होता. त्याला जाब विचारायचा असं ठरवून मी सकाळीच कार्यालय गाठलं. कामकाज सुरू करणार तोच बाप्पा समोर पुढ्यात येऊन हजर!
मी- बाप्पा, बरं झाला आलास! अरे कालच्याला काय काय बोललास! जैन बांधवांचं पवित्र समजलं जाणारं पर्युषण महापर्व आणि त्यानिमित्ताने क्षमापना म्हणजेच माफीनामा मागणार पर्व अन्य कोणत्या जाती- धर्मात होते का रे? हाच एकमेव समाज आहे की तो किमान वर्षभरातून एकदा तरी माफीनामा मागतो! कालच्याला, एक दिवसाचा माफीनामा आणि वर्षभर घोडे, हे असं तुझं बोलणं मला पसंत पडलं नाही.
श्रीगणेशा- अरे… रे! किव येते तुझ्या बुद्धीची! जैन बांधव वर्षभरातून किमान एकदा तरी माफीनामा मागतात हे वास्तव सत्य आहेच! मकरसंक्रातीच्या निमित्ताने सारेजण तिळगुळ वाटतो, गोड बोला म्हणतो आणि हे बोलताना मनातल्या मनात काय- काय बोलतो हे सांगू का? खरंतर प्रत्येकानेच आपल्या आचरणात क्षमाशीलता आचरणात आणण्याची गरज आहे. तिळगुळ दिल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याचा खून करणारे तुमच्यातीलच काही आहेत! मुद्दा समजून घेण्याची गरज आहे. तो समजून न घेता साप-साप म्हणून भुई थोपटण्याची तुमची सवय जाणारच नाही. खरं तर जैन समाजाचे माफीनाम्याच्या मुद्यावरील अनुकरण आपण सारे करणार आहोत की नाही याचाही विचार होण्याची गरज आहे. मात्र, त्याच्याच जोडीने एक दिवसाची माफी मागायची आणि वर्षभर मनात द्वेष, क्लेश ठेवायचा, त्यातून मनात कटुता धरायची आणि वाईट- साईट बोलायचे हेही थांबलेच पाहिजे. हे थांबले तर पुन्हा वर्षभरानंतरच्या माफीनाम्याला अर्थ आहे, यात चुकीचे काय? अरे बाबा, मनात द्वेष, क्लेश असला की जीवन अस्थिर बनते. आनंदी जीवनासाठी द्वेष व लेशमुक्त झाले पाहिजे. क्षमापना हे जैन धर्मातील आत्मशुद्धीचे पर्व आहेच. त्याच आत्मशुद्धीचा विचार केला तर त्याचे अनुकरण सार्याच धर्मीयांनी केले पाहिजे. दैनंदिन जीवन जगताना प्रत्येकाकडून अनवधानाने अथवा जाणीवपूर्वक चुका होतातच. कधीकधी एखाद्याला अपमानास्पद बोलले जाते. यातून मनात कटुता निर्माण होते. राग लोभाचे परिमार्जन करणे व त्यासाठी क्षमा मागणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहेच. एखाद्याला क्षमा करणे याहीपेक्षा मनापासून क्षमा मागणे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहेच. नम्रता व क्षमाशीलता प्रत्येकाने आपल्या आचरणात आणावी हीच क्षमापना पर्वाची मुख्य शिकवण आहे ना! मग, हे पर्युषण पर्व वर्षभर आहे असं समजून दुसर्याच्या भावना दुखावणार नाही, त्याच्याबद्दल अपमानास्पद बोलणार नाही, कटुता निर्माण होणार नाही असं वागलो तर! पण, तुम्ही मंडळी असे करुच शकत नाही! तुमच्या इंद्रीयाला वळणच असे पडले आहे की, क्षमापनाच्या दुसर्या क्षणाला एकमेकांकडे पाहताना कपाळावर डझनभर आढ्या तुम्ही मंडळी आणणार म्हणजे आणणार! मग, तूच सांग या मिच्छामी दुक्कडम्ला काही अर्थ आहे काय? उगीच माझ्या बोलण्याचा विपर्यास नको! आणि हो, काही चुकलं असंच वाटत असेल तर ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणून मलाही माफ कर!
मी- बाप्पा, अरे तू माफीनामा मागून आम्हा भक्तांना लाजवू नकोस! आमचं काही चुकलं असेल तर त्यात नक्कीच आम्ही सुधारणा करू! पुढच्या वर्षी क्षमापना मागताना यावेळच्या पेक्षा कमी चुका आम्ही केलेल्या असतील. भावना आणि त्यातही त्या जाणूनबूजन तर नक्कीच आम्ही मंडळी दुखावणार नाही हा शब्द देतो!
श्रीगणेशा- कोणते शब्द पाळलेत तुम्ही! कशाला पुढार्यांसारखं भाषण ठोकतो!
मी- बाप्पा, समजून घे! तूच आहेस ना आमचा विघ्नहर्ता! तूच आहेस ना आमचा तारणहार!
श्रीगणेशा- पर्युषण पर्व आहे ना! चल, माफ केले मीही तुम्हा सर्वांना!
मी- बाप्पा, तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने महापालिका प्रशासन जोरदार तयारी करत आहे. तुझ्या आगमनाच्या निमित्ताने रस्त्यांवर टाकलेले मंडप रहदारीला अडथळा ठरणार नाहीत याची काळजी घेतानाच तुझ्या दर्शनासाठी येणार्या भक्तांना मोकाट कुत्र्यांचा त्रास आता होणार नाही! मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतलीय बरं का! रोज किमान १५ कुत्री पकडली जातात! आतापर्यंत १३ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण झालंय आणि १२ हजार कुत्र्यांचे आणखी होणार आहे. कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्यात आल्यानंतर त्यांच्या गळ्यात बेल्ट लावला जात असून त्यांच्या कानावर व्ही मार्क कट मारला गेलाय!
श्रीगणेशा- पत्रकारीता सोडून महापालिकेचा प्रसिद्धी अधिकारी कधीपासून झालास? मला माहितीय की डांगे साहेब तुझे मित्र आहेत! रस्त्यावर, चौकाचौकात माझ्या स्वागताचे मंडप टाकलेत हे वास्तव असले तरी त्यातील ९० टक्के मंडप हे बेकायदेशिर आणि नियमांचा भंग करणारे आहेत. तुझ्या आयुक्त मित्राने ठरवले तरी ते या मंडपाला हात लावू शकत नाही. कारण, मंडपाच्या आजूबाजूला ज्या नेत्यांचे फोटो आहेत, ते नेतेमंडळी लागलीच आयुक्तांवर राजकारण केल्याचा आरोप करणार!
मी- बाप्पा, आयुक्तांना काय गरज पडली राजकारण करण्याची! नियमाला धरुन ते कामकाज करणारच! त्यांना कोण अडवणार? त्यातही महपालिकेत सध्या प्रशासक म्हणून तेच प्रमुख आहेत!
श्रीगणेशा- मित्रवर्य आयुक्त राजकारण नक्कीच करणार नाहीत! पण, त्यांच्या आडून राजकारण केले जाणार हे त्यांनाही माहितीय आणि तुलाही! पण, तरीही नगरकरांना शिस्त लावण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. रस्त्यावर रहदारी आणि नागरिकांना अडथळा ठरेल असे नियमबाह्य मंडप, आकडा टाकून वीज जोडणी घेतली गेली असेल तर त्याला अटकाव करावाच लागेल! तुमच्याकडे दहा-बारा जणांना एकाचवेळी आमदारकीचे डोहाळे लागले आहेत आणि त्यातून यावेळी मंडपांची साईज देखील वाढली आहे. काही मंडपांवर कारवाई केल्याचे सांगितले जात असले तरी आयुक्तांना आता थांबून चालणार नाही. मोठ्या मंडळांवर कारवाई केली तरच आयुक्तांची ही कारवाई नि:पक्षपाती म्हणता येईल.
तोंडदेखली आणि प्रसिद्धीसाठी आयुक्तांनी काम केले तर त्याचा जाब मीच काय तमाम नगरकर विचारतील आणि मग त्यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप होणारच! मोकाट कुत्र्यांबद्दल कौतुक करणारं तुझं भाषण मी एकेलं! कुत्र्यांच्या नावाखाली यापूर्वी काय-काय खाल्लं आणि कोणीकोणी खाल्लं हे सांगू का? आधीच्या आयुक्तांना ही कुत्री सुद्धा कमी पडली! त्यांनी त्यातही मलई समजून हात मारल्याची चर्चा आहे. आता तुझ्या या आयुक्त मित्रानं ठरवायचं की मोकाट कुत्र्यांच्या मुद्यावर बदनाम व्हायचं की त्यांच खाऊन बदनाम व्हायचं! मोकाट कुत्री पकडण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात एक संस्था नेमली आणि तिनं लागलीच १३ हजार कुत्री पकडली असा सतीश जेजुरकर या तुझ्या दुसर्या मित्राचा दावा आहे! एका दिवसात १२ ते १५ कुत्री पकडली जात असल्याचे राजूरकर सांगत आहेत. त्यांच्याच दाव्यानुसार दररोज १५ कुत्री पकडली जात असल्याचे मान्य केले तर त्यानुसार १३ हजार कुत्री पकडण्यासाठी ८६५ दिवस लागले आहेत! अद्याप १२ हजार कुत्री पकण्याचे काम बाकी आहे.
म्हणजे आणखी ८०० दिवस हे काम करावे लागणार आहे. याचाच अर्थ १६६५ दिवस काम केल्यानंतर २५ हजार कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण होणार आहे. काय धंदा लावला राव तुमच्या महापालिकेने! जवळपास साडेचार वर्षे हे करावे लागेल आणि साडेचार वर्षात कुत्र्यांची संख्या दहापटीने वाढलेली असेल! आयुक्तांसह राजूरकरांना पुरस्कारच दिला पाहिजे! दिल्लीगेटच्या वेशीवर त्यांना घेऊन येतो का! मीच त्यांचा मोठा सत्कार करतो आणि कुत्र्यांच्या नावाखाली मांडलेलं त्यांचं हे दुकान नगरकरांना कसं वेड्यात काढत आहे हे मीच आणखी जोरकसपणे पटवून देतो! राजूरकर मुळचे नगरचेच ना! त्यांनी तरी किमान भान राखावं! मी बोललो की तुम्हा मंडळींना झोंबतं! भावना दुखावल्या असं वाटतं! पण, वास्तव समजून घ्या ना! चल निघतो मी! पुन्हा उद्या भेटतो याच कुत्र्यांंच्या मुद्यावरील ऑडीट रिपोर्ट घेऊन! (दुसर्या क्षणाला बाप्पा निघून गेला आणि मीही माझ्या कामाला प्रारंभ केला.)