अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील आनंद विद्यालयासमोर संजय किराणा दुकानाजवळ एका 85 वर्षीय वृध्देच्या गळ्यातील सुमारे एक लाख 40 हजार रूपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे दोन सोन्याचे गंठण अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून नेल्याची घटना रविवारी (27 एप्रिल) सायंकाळी घडली.
याप्रकरणी शांताबाई रावजी सोनवणे (वय 85, रा. प्लॉट नं. 5, आनंदनगर, गुलमोहर, सावेडी) यांनी दुसर्या दिवशी सोमवारी (28 एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी तिघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शांताबाई सोनवणे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या.
दर्शन आटोपून त्या घरी परत येत असताना सातच्या सुमारास गुलमोहर रस्त्यावरील आनंद विद्यालयाजवळील संजय किराणा दुकानाजवळ तीन अनोळखी इसम उभे दिसले. त्यांना वाटले की ते इसम त्याच परिसरातील रहिवासी असतील. मात्र त्यातील एकाने शांताबाई यांच्या साडीचा पदर ओढताच दुसर्याने गळ्यातील दोन सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून पळ काढला. हा प्रकार पाहूण शांताबाईंना त्या क्षणी चक्करही आली. त्यांनी घरी जाऊन घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर दुसर्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
पोलीस अधिक तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच संशयित चोरट्यांचा माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.