Maharashtra Crime News: सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा टाकत तिघांनी सराफास लुटल्याची घटना घडली आहे. नाशिक पोलिसांनी तिघांपैकी दोघांना अटक करत एक पिस्तूल देखील हस्तगत केले. मात्र या टोळीचा म्होरक्या परराज्यात पळून गेल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली होती. आता नाशिक पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याला हरियाणातून बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको परिसरातील अंबड शिवारातील महालक्ष्मी नगर येथे मुख्य रस्त्यालगत असलेल्या ‘श्री ज्वेलर्स’ या दुकानात दोन दरोडेखोर सोमवारी दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून शिरले. त्यांचा तिसरा साथीदार दुचाकी घेऊन दुकानापासून पुढे काही अंतरावर थांबलेला होता. दुकान मालक दीपक घोडके व त्यांची पत्नी मनीषा घोडके हे दुकानात असताना त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून तोंडावर मिरची स्प्रे फवारून दुकानातील 30 तोळे सोन्याचे दागिने लूट करून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्तुल हस्तगत केली होती. तर तिसऱ्या दरोडेखोराचा पोलिसांकडून शोध सुरु होता. त्यातच या दरोडेखोरांच्या टोळीचा म्होरक्या परराज्यात पळून गेल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. यानंतर नाशिक पोलिसांचे एक पथक हरियाणा येथे रवाना झाले. नाशिक पोलिसांनी सराईत गुन्हेगार असलेला नरेंद्र अहिरवार यास शिताफीने अटक केली आहे.