अहमदनगर । नगर सहयाद्री-
वडगाव सायतळ (ता. पारनेर) येथे ६ जून रोजी दरोडा टाकून सुमारे ७ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेचा तपास करत दरोडेखोरांना जेरबंद केले आहे. आरोपींमध्ये एका सराईत दरोडेखोराचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत केले.
वडगाव सायताळ शिवारातील खामकर झाप येथील अंकुश भाऊ भोसले (वय ५०) हे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना चार दरोडेखोर त्यांच्या घरात घुसले. भोसले कुटुंबीयांना मारहाण करुन ६ लाख ९० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस करीत होते.
पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत थोरात व सहकाऱ्यांनी पारनेर परिसरात फिरुन या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढली असता, मिथुन उंबऱ्या काळे (रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) व त्याच्या साथीदारांनी ही जबरी चोरी केल्याचे समजले.
पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौघांना ताब्यात घेतले, तर २ जण पळून गेले. मिथुन काळे (वय २३), अक्षय उंबऱ्या काळे (वय २६), संजय ऊर्फ संज्या हातण्या भोसले (वय ५५, सर्व.रा. सुरेगाव) व गंगाधर संदल चव्हाण (वय २१, रा. दिवटे वस्ती, वाघुंडे, ता. पारनेर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे दागिने सापडले. वडझिरे शिवार, भनगडवाडी व वडगाव सावताळ परिसरात केलेल्या चोरीतील हे दागिने असल्याचे सांगितले आहे.