अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरच्या शेंडी (ता. नगर) शिवारात दरोडेखोरांच्या टोळीने लाकडी दांडके, लोखंडी रॉड व चाकूने जीवघेणा हल्ला केला. तसेच सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा 78 हजार 600 रूपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अशोक लहानू कजबे (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंडी (ता. नगर) शिवारातील बायपास रस्त्यावर खंडोबा मंदिरा जवळील एका वस्तीवर सोमवारी पहाटे एकच्या सुमारास सहा ते सात दरोडेखोरांनी कजबे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी अशोक कजबे, त्यांचे वडिल लहानू कजबे व आई जनाबाई कजबे यांना लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केली. धारदार चाकूने मारण्याची धमकी देत दमदाटी केली.
फिर्यादी आई जनाबाई, पत्नी व मुलीच्या अंगावरील सोन्याचे टॉप्स व वेल (7 ग्रॅम), मंगळसूत्र (2.5 ग्रॅम), चांदीचे जोडवे (सात भार), सोन्याची रिंग (1.5 ग्रॅम), मंगळसूत्र (5 ग्रॅम), कानातील कुडके (2 ग्रॅम) व दोन हजार 600 रूपयांची रोकड असा 78 हजार 600 रूपयांचा ऐवज चोरून नेला. असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.