राहुरी । नगर सहयाद्री:-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक आझाद मैदान परिसरात जमले आहेत. या मराठा आंदोलनाला पाठींबा देत राहुरीकरांनी रास्ता रोको आंदोलन केले. नगर- मनमाड मार्गावर एक तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
एक मराठा लाख मराठा म्हणत राज्यभरातून मराठा बांधव मुबंईत एकत्र जमले आहेत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी हाती घेतला आहे. मात्र आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आंदोलकांना आझाद मैदान परिसर रिक्त करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.
या पाश्ववभूमीवर मंगळवार दि. २ रोजी राहुरी कृषी बाजार समीतीसमोर मराठा बांधवांसह विविध पक्ष आणि संघटनेच्या कार्यकर्तेनी रास्ता रोको अंदोलन केले. यावेळी प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, वंशावळ जोडण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.