अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
पूर्वीच्या वादातून एका 28 वर्षीय तरूणावर हल्ला झाल्याची घटना शनिवारी (5 एप्रिल) पहाटे 1.30 वाजताच्या सुमारास माळीवाडा येथील अण्णा भाऊ साठे वसाहत समोर घडली आहे. सागर अनिल विधाते (रा. जिल्हा परिषद कार्यालय समोर, माळीवाडा, अहिल्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी आकाश प्रकाश कदम, प्रितम ऊर्फ जय प्रकाश कदम, नितीन कदम (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. माळीवाडा, अहिल्यानगर) आणि बंडु आव्हाड (पूर्ण नाव माहिती नाही, रा. केडगाव, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयित आरोपींनी मिळून हा हल्ला केला.
शुक्रवारी (4 एप्रिल) झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संशयित आरोपींनी सागर विधाते यांना पहाटे आरडाओरड करून बोलावले आणि त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संशयित आरोपी प्रितम कदम याने आपल्या जवळील चाकूने सागर यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर संशयित आरोपींनी सागरला धमकी देताना सांगितले की, बंडु आव्हाडने आम्हाला पाठवले आहे, आमच्या नादाला लागू नको. सागर यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी संबंधित संशयित आरोपींविरूध्द गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.