अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहरातून रिक्षा, दुचाकी चोरणारा व चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. केडगाव लिंक रस्त्यावर चोरीची रिक्षा विकण्यासाठी येताच पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून एक रिक्षा, एक मोपेड दुचाकी व 10 ग्रॅमची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली. तपासात तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोन्या उर्फ सुरज शिवाजी शिंदे (वय 30, रा.टिळक रोड, कानडे प्रेशर पंपाजवळ, अहिल्यानगर) असे पकडलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. संगीता पुंडलीक मोरे (रा.आदिशक्ती बंगलो, दातरंगे मळा) या कल्याण रोडने जात असताना अज्ञात आरोपीनी दुचाकीवरून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पळवली होती. याचा तपास करत असताना केडगाव येथून लिंक रोडने अहिल्यानगर शहराकडे एक व्यक्ती चोरीची रिक्षा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने कल्याण लिंक रोडला सापळा रचून संशयीत रिक्षा थांबवून, त्याला ताब्यात घेतले.
तपासत सदरची रिक्षा ही पुणे येथून चोरून आणल्याची माहिती आरोपीने दिली. तसेच, आठ ते दहा महिन्यांपूव अहिल्यानगर – पुणे रोडवर स्वीट होम येथून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून नेल्याचे व दोन महिन्यापूव केडगाव येथून एक मोपेड दुचाकी योगेश संजय रक्ते (रा.गॅस कंपनी चौक, एमआयडीसी, अहिल्यानगर (पसार) याच्या मदतीने चोरी करून ती श्रीसिध्दीविनायक ट्रेडर्स समोरील काटवनात लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. कोतवाली पोलिस ठाण्यातील दोन व चाकण पोलीस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.