अमरधाम समोरील धक्कादायक प्रकार; एकावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका रिक्षाचालकाला लाकडी क्रिकेट बॅटने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ३) सायंकाळी शहरात घडली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून, “पैसे दिले नाहीस तर जीवे मारून टाकेल,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना केडगाव परिसरातील अमरधामसमोरील निलेश ठोंबरे यांच्या दुकानात सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रिक्षाचालक अनिल एकनाथ जेवुघाले (वय ५०, रा. अजिंक्य कॉलनी, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल जेवुघाले हे ठोंबरे यांच्या दुकानात उभे असताना आरोपी अजय लक्ष्मण वाडेकर (रा. शिवाजी नगर, केडगाव) तेथे आला. त्याने जेवुघाले यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. जेवुघाले यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आरोपी अजय वाडेकर संतापला. त्याने प्रथम फिर्यादीस शिवीगाळ केली आणि त्यानंतर दुकानातच असलेली लाकडी क्रिकेटची बॅट उचलून फिर्यादीवर हल्ला चढवला.
आरोपीने बॅटने फिर्यादीच्या उजव्या डोळ्याजवळ, उजव्या खांद्यावर आणि पाठीवर जोरदार मारहाण करून त्यांना जखमी केले. “तु मला पैशे दिले नाहीस तर तुला जीवे मारून टाकेल,” अशी धमकी देत तो तेथून निघून गेला.
या घटनेनंतर अनिल जेवुघाले यांनी मंगळवारी (दि. ४) कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय लक्ष्मण वाडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉ/प्रदिप बडे करत आहेत.



