Maharashtra Crime News: मुंबईत दहा वर्षांपूर्वी झालेल्या घटस्फोटाला सासू जबाबदार असल्याच्या रागातून एका जावयाने आपल्या सासूला टेम्पोत जाळून मारल्याची आणि नंतर स्वतःलाही पेटवून घेतल्याची भयंकर घटना मुलुंडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटला होता, पण सखोल चौकशीनंतर जावयानेच सासूची हत्या करून आत्महत्या केल्याचे उघड झाले.
मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा येथे राहणाऱ्या बाबी दाजी उसरे (७२) यांचा जावई कृष्णा दाजी अष्टणकर (५६) याने, घटस्फोटाला सासूच जबाबदार असल्याचा राग मनात धरून हे कृत्य केले. कृष्णा टेम्पो चालक होता आणि पत्नी व मुलांपासून वेगळा राहत होता. सोमवारी सकाळी कृष्णा उसरे यांच्या घरी गेला आणि बाबी यांना रुग्णालयात घेऊन जातो, असे सांगून टेम्पोत बसवले.
बाबी त्याच्यासोबत विश्वासाने गेल्या, कारण तो अनेकदा त्यांच्या घरी येत असे. टेम्पोत बसल्यावर कृष्णाने काही अंतरावर टेम्पो थांबवला आणि शटर ओढून घेत आतून कुलूप लावले. यानंतर त्याने बाबी यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला, आणि नंतर अंगावर पेट्रोल आणि थिनर टाकून पेटवून दिले. या आगीत तोही गंभीररित्या भाजला गेला.
टेम्पोमधून धूर येत असल्याचे नागरिकांनी पाहताच, त्यांनी पोलिसांना कळवले. अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर पोलिसांनी टेम्पोचे शटर उघडले. आतमध्ये पोलिसांना दोघांचेही जळालेले मृतदेह आढळून आले. तसेच, टेम्पोमध्ये हातोडा, थिनरची बाटली आणि लायटरही सापडले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी वीर सावरकर रुग्णालयात पाठवण्यात आले. नवघर पोलिसांनी (Navghar Police) कृष्णाविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.