मुंबई । नगर सह्यद्री
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, दिवाळीच्या तोंडावरही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. नवरात्रोत्सवात पावसाने भरपूर दडी मारल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ९ आणि १० ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो, काही ठिकाणी वीजांचा कडकडाटही जाणवेल. हवामान बदलामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गुरुवार ९ ऑक्टोबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे
उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांत पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, पिकांची काढणी सुरू असताना पावसाचा जोर वाढल्यास नुकसान अधिकच वाढण्याची भीती आहे.