नगर, पारनेर, राहुरीत दमदार पाऊस | सरासरी १२९ मिलीमीटर पावसाची नोंद
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
परतीच्या पावसाने नगर शहरासह जिल्ह्यात चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने चार दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी नगर शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. एकाच दिवशी २३.८ मिलीमिटर पाऊस झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
गणेशात्सवात अकरा दिवस विश्रांती दिल्यानंतर मागीत दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवार, रविवारी दोन दिवस जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. सोमवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने सोयाबीन, मूग, बाजरी, उडदासह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्याच्या उत्तर भागात दमदार पावसाने हजेरी लावली.
परंतु दक्षिण भागात दमदार पावसाची प्रतिक्षाच होती.. जून पासून जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर वाढला. कर्जत, जामखेड, पाथर्डी, नगर, पारनेर तालुक्यात कमी पर्जन्यमान असणार्या ठिकाणी दमदार पाऊस झाला. त्यामुळे बंधारे, पाझर तलाव, नदी नाले, ओढे वाहते झाले आहेत. परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषण वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप पिकांचे मोठे नुकसान
यंदा सुरुवातीला जिल्ह्याच्या उत्तर भागात दमदार पाऊस झाला. ऑगस्ट अखेरपर्यंत दक्षिण भागाला दमदार पावसाची प्रतिक्षाच होती. खरिप हंगामातील सोयाबीन, मूग, बाजरी, उडीद पिके यंदा चांगली आली. परंतु, सध्या होत असलेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने पुन्हा हिरावला जाण्याची शक्यता आहे. नगर, पारनेर, राहुरी तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सीना नदीला पूर
नगर तालुक्यातील जेऊर परिसरात व नगर शहरात सोमवारी रात्री परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नगर शहरातून वाहणार्या सीना नदीला पूर आला होता. रात्री झालेल्या पावसामुळे मंगळवारी दुपारपर्यंत नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सद्यस्थितीत नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पुलाचे काम सुरु असल्याने आणि पाऊस होऊन येणार्या पुरामुळे वाहतूक बंद होत असल्याने नागरिकांना केडगाव मार्गे नगरला यावे लागत आहे.
नगर, पारनेला अतिवृष्टी
परतीच्या पावसाने नगर जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. सोमवारी नगर तालुक्यात ४०.५, पारनेर ६१.३, श्रीगोंदा २७.१, राहुरी ४८.६, श्रीरापूर २२.६ मिलीमिटर पाऊस झाला. तर इतर तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी १२९.३ मिलीमिटर पाऊस झाला आहे. नागापूर ७३.५, रुईछत्तीशी १०२, पारनेर ९८, टाकळी ८४.८ मिलीमिटर या महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली,