अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
गाव पातळीवरील राजकारणात महत्त्वपूर्ण असणाऱ्या सरपंच पदाचे आरक्षण आता पुन्हा एकदा नव्याने जाहीर केले जाणार आहेत. 23 व 24 जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपूव सरपंच आणि उपसरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुका घेतल्या जातात.
दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी सुटलेल्या आरक्षणानंतर अनेकांचा हिरमोडही झाला होता. काहीजणांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणात बदल केला जाणार असून, राज्य शासनाने नव्याने आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात महिला, सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण निघणार याचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने तयार करून मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांना पाठवला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया या कार्यक्रमाला मान्यता दिल्यानंतर 23 आणि 24 जुलै रोजी उपविभागीय पातळी आणि तहसील कार्यालय पातळीवर सरपंच पदाच्या सोडती काढण्यात येणार आहे.
624 ठिकाणी सरपंचपद खुले
2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 1 हजार 223 ग्रामपंचायत पैकी 624 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात 312 ठिकाणी महिलांचा समावेश असणार आहे. यासह 330 ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी सरपंच पदाचे आरक्षण राहणार असून यात 165 महिलांना संधी मिळणार आहे. तर 119 ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून यात 60 ठिकाणी महिला, तसेच दीडशे ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून यात 75 महिला सरपंच यांचा समावेश राहणार आहे.
बुधवारी पारनेर, नगर तालुक्यातील सरपंचपद आरक्षण सोडत
नगर तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधित मुदत संपणाऱ्या 105 ग्रामपंचायतिंच्या सरपंचपदाचे आरक्षण (बुधवारी) जाहिर होणार आहे अशी माहिती तहसिलदार संजय शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर तालुक्यातील 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या काळात तालुक्यातील 105 गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी बुधवार दि. 23 जुलै रोजी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता व दुपारी 1 वाजता अशा दोन टप्प्यात हि आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत बुधवारी इंदिरा भवन, पारनेर पोलिस स्टेशन समोर होणार आहे.