अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नवनागापूर शिवारातील गव्हाणे वस्ती, शेंडी बायपास येथील एका शेत जमिनीतील गहू पिकाचे नुकसान करून त्यावर ताबा मारण्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास शेत गट नंबर 88/3 मध्ये ही घटना घडली. या प्रकरणी 13 ते 15 जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ दामोधर गव्हाणे (वय 46 रा. नवनागापूर, गव्हाणे वस्ती, शेंडी बायपास) यांनी फिर्याद दिली आहे. रोहन पोपट बारस्कर, रोहित पोपट बारस्कर, रवी भिमराज भोर ऊर्फ बाल्या व एका विशिष्ट समाजातील 10 ते 12 अनोळखी पुरूष व महिलांविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. नवनाथ यांची नवनागापूर शिवारातील गव्हाणे वस्ती, शेंडी बायपास येथे गट नंबर 88/3 मध्ये शेत जमीन आहे. त्यामध्ये सध्या गव्हाचे पिक आहे.
सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास रोहन बारस्कर, रोहित बारस्कर, रवी भोर व इतर अनोळखी पुरूष व महिला तेथे आले. त्यांनी नवनाथ यांना शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्या गहू पिकाचे नुकसान केले. बेकायदेशीरपणे परवानगी शिवाय शेतात थांबून राहिले. सदरचा प्रकार नवनाथ यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविला व फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार गणेश पालवे करत आहेत.