अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बांधवांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी आयुक्तांनी 15 दिवसांची मुदत मागत आमदार संग्राम जगताप यांना लेखी आश्वासन दिले.
निवेदन देताना सागर बेग, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, भीमराव आव्हाड, राहुल सांगळे, बाली बांग, सचिन जगताप, मुळू गाडळकर, दिनेश जोशी, मंगेश खताळ आदींसह मोठ्या संख्येने अन्य हिंदू बांधव उपस्थित होते.
अहिल्यानगर शहरातील सर्वच रस्त्यांवरील असलेली व वाढत चाललेली अवैध मजारे आणि थडगे यामुळे शहरातील अनेक अरुंद रस्त्यावर वाहतूक करणे अवघड होत आहे. जाणूनबुजून काही विशिष्ट समाजाकडून अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी हिरवी चादर टाकून थडगे, मजार निर्माण केलेले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. काही ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते यावर अशा प्रकारचे अतिक्रमणांमुळे रस्त्याने जाण्या येण्यास मोठा अडथळा निर्माण होतो.
तसेच या समाजाकडून या अवैध मजार, थडग्यावर काही कार्यक्रम घेतले जातात व त्यावेळी पूर्ण रस्ते बंद केले जातात. या समाजाकडून अशा प्रकारचे धड़गे, मजार निर्माण करून त्या जागेवर वफ्फ बोर्डाकडून या जागेवर हक्क सांगितला जातो. अशा प्रकारे रस्त्याची व सरकारी जागेवर अतिक्रमण करून या जागा गिळंकृत करण्याचा कट यामागे आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. तरी बालिकाश्रम रोडवरील थडग्याचे अतिक्रमण काढा अशी मागणी हिंदू बांधवांच्या वतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.