विधानसभेत आवाज उठवा | गणेश मूर्तिकार संघटनेचे आ. जगताप यांना साकडे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पीओपी गणेश मूर्ती वरील बंदी कायमस्वरूपी रद्द करावी असे साकडे गणेश मूर्तिकार संघटनेने आ. संग्राम जगताप यांना घातले. तसेच विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मूर्तिकारांना न्याय मिळवून द्यावा असेही गणेश मूर्तिकार संघटनेने म्हटले आहे.
अहिल्यानगर महापालिकेने दि. १६ मे २०२४ रोजी गणेश मूर्ती करांना सुचना दिल्या आहेत. मूर्ती कारखानदारांनी मनपास २९ मे २०२४ च्या निवेदन पत्रामध्ये पीओपी हा खनिज पदार्थ असुन यात कोणत्याही प्रकारचे कैमिकल नसल्या कारणे प्रदूषण करत नसल्याबाबत पुरावे सादर केलेली आहे. त्याबाबत १६० पानी कागदोपत्री पुरावे व शास्त्रज्ञांच्या डोळस पर्यावरण या पुस्तकासह सर्व पुरावे मनपास सादर केलेली आहेत. तसेच माजी मंत्री दिपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये दि.२७ जुलै २०२३ रोजी पीओपी संदर्भात पीओपी मूर्तीचे उत्पादन आणि विक्रीवर कोणत्याही प्रकारची बंदी नाही असे सांगितले आहे.
पीओपी वरील निर्णय रद्द करून गणेश गणेशमूर्तीकारांना न्याय मिळवून द्यावा असे आशयाचे निवेदन अहमदनगर गणेश मूर्तिकार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष भरत निंबाळकर, वसंत लोढा, संतोष रायपेल्ली, संजय देवगुनी, संदीप सुसरे, नितीन राजापुरे, चंद्रकांत जोरवेकर (संगमनेर), राजू दळवी (राहता), विकास गोरे (राहुरी), तानाजी वाघमोडे (नेवासा), संजय पारखे (पाथर्डी), खंडू चंदन (श्रीगोंदा) आधी सह जिल्हाभरातून २०० मूर्ति कारखानदार उपस्थित होते.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी मूर्तिकारांचा प्रश्न विधानसभेत मांडून तो सोडवण्याचे सांगत मनपाआयुक्तांशी चर्चा करून शहरातील गणेश मूर्तिकारांना न्याय मिळवून देऊ असे सांगितले.