पारनेर । नगर सहयाद्री
पारनेरतालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या प्रति पंढरपूर पळशी येथे रविवार, दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त भव्य धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू जाधव यांनी दिली. या उत्सवात राज्यभरातून आणि परिसरातील भाविक विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत.
पहाटे पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, दिवसभर विविध पूजाअर्चा, कीर्तन, अभिषेक, आरती आदी धार्मिक विधी पार पडणार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात स्नान, अभिषेक, आरती आणि महापूजा करण्यात येणार आहे. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आरती व पूजनानंतर सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविक भक्तांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने चहा व खिचडी प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात हजारो भाविक भक्तीभावाने सहभागी होणार आहेत.धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान शिबीर व मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजनही याठिकाणी करण्यात आले आहे. या पवित्र उत्सवात सहभागी होऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्याचे व आरोग्य शिबिराचा लाभ घेत रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठू जयवंत जाधव, सर्व विश्वस्त, तसेच पळशी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.