Ajit Pawar News: महायुती सरकारचा शानदार शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. शपथविधी सोहळ्याच्या दुसर्याच दिवशी अजित पवारांना दिल्लीतून मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते अजित पवार यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ती सर्व मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिल्ली ट्रिब्यूनल न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या मालमत्तांचा समावेश होता. इन्कम टॅक्स विभागाकडून मोठी कारवाई करताना अजित पवार कुटुंबियाच्या मालमत्ता जप्त करण्यात आली होती.अजित पवारांच्या कुटुंबियांनी इन्कम टॅक्स विभागाच्या या धडक कारवाईच्या विरोधात दिल्ली न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल,निबोध ट्रेडिंग, फायर पॉवर अॅग्री फार्म तसेच गुरु कमोडिटी कंपनीशी संबंधित मालमत्तांचा समावेश होता. आता याप्रकरणी दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर या सर्व मालमत्ता मुक्त करण्यात आल्या आहेत.