मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र सरकारकडून विविध महामंडळांद्वारे उद्योजक तयार करण्यासाठी अर्थसहाय्य केलं जातं. मराठा समाजात उद्योजक तयार करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अर्थकसंकल्पात 750 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यासंदर्भातील शासन निर्णय 15 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. याच शास निर्णयातील माहितीनुसार 300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळं मराठा समाजात नवे उद्योजक निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 750 कोटी रुपये देण्यासंदर्भातील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 300 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. नियोजन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून ज्या योजना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला गती देण्यासाठी चालवल्या जातात त्यासाठी 300 कोटी वर्ग करण्यात आल्या आहेत.
नरेंद्र पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटींचा निधी वर्ग करण्यात आल्याचा शासन निर्णय सर्वांना मिळाला असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, असं नरेंद्र पाटील म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला गेला, अशी टीका होऊ शकते, असं देखील नरेंद्र पाटील म्हणाले. राज्य सरकार सगळ्याच महामंडळांना निधी देतं, असं पाटील म्हणाले. अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 20 टक्के, 30 टक्के, 40 टक्के, 50 टक्के अशा प्रकारे निधी दिला जातो. मिळालेला निधी खर्च केल्याची माहिती नियोजन विभागाला दिल्यानंतर पुढील निधी मिळतो, असं नरेंद्र पाटील म्हणाले.
आम्हाला 2024-25 या आर्थिक वर्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात 350 कोटी देण्यात आले. आपण 300 कोटी लाभार्थ्यांना दिल्यानंतर आणखी निधीची गरज लागली. त्यामुळं नंतर 50 कोटी रुपये देण्यात आले, असं नरेंद्र पाटील म्हणाले. मराठवाड्यात महामंडळाचं उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं देखील नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.मराठवड्यात बीडमध्ये उपकेंद्र उभारण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचं देखील नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.