मुंबई | नगर सहयाद्री:-
लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अथवा घटस्फोटित महिला आहेत, त्यांनाही आता e-KYC प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंबंधी माहिती दिली.
राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना १८ नोव्हेंबरपूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. सुरुवातीला केवायसी करताना महिलांना त्यांच्या पती किंवा वडिलांचे केवायसी अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, पती व वडील दोघेही हयात नसलेल्या महिलांना यामुळे अडचण निर्माण झाली होती.
सरकारचा नवीन निर्णय
आता अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे. या पर्यायामध्ये लाभार्थी महिला त्यांच्या पती अथवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करू शकतील. तर घटस्फोटित महिलांना घटस्फोटाचे अधिकृत कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध होईल. या प्रक्रियेद्वारे महिला व बालविकास विभाग संबंधित माहिती पडताळून लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करेल.
महिलांसाठी मोठा दिलासा
या निर्णयामुळे पती व वडील हयात नसलेल्या हजारो लाभार्थी महिलांना दिलासा मिळणार आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लाभ रोखले जाण्याची शक्यता होती; मात्र नव्या पर्यायामुळे त्या महिलांना कोणतीही अडचण येणार नाही. राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना आवाहन केले आहे की, १८ नोव्हेंबरपूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून योजनेंतर्गत लाभ वेळेवर मिळू शकेल.



