अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे खून खटला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मयत रेखा जरे यांचा मुलगा कुणाल जरे येत्या सुनावणीत आपल्या आईच्या खुनाबाबत न्यायालयात साक्ष देणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.
अलिकडेच या खटल्यातील आरोपी सागर भिंगारदिवे याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या निर्णयानंतर जिल्हा सत्र न्यायालयातील पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे, तसेच कायदा क्षेत्रातील जाणकारांचेही लक्ष लागले आहे. घटनेच्या वेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या कुणाल जरे याची साक्ष सरकार पक्षासाठी निर्णायक ठरणार आहे.
सरकारी वकील अॅड. ए. डी. ढगे यांनी कुणालचा सरतपास सुरू केला असून, त्यानंतर आरोपींच्या वकिलांकडून होणारा उलटतपास खटल्याचे भवितव्य ठरवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. याआधी मयत रेखा जरे यांची आई व मैत्रीण विजयमाला माने यांनीही न्यायालयात हजर राहून महत्त्वपूर्ण साक्ष दिली होती. त्या वेळी आरोपी पक्षाचे वकील ड. परिमल फळे यांनी केलेल्या उलटतपासाची चर्चा अद्याप कायदा वर्तुळात रंगलेली आहे.
२३ सप्टेंबरला पुढील सुनावणी
या प्रकरणातील पुढील सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. कुणाल जरे यांचा उलटतपास अॅड. परिमल फळे हे मुख्य आरोपीतर्फे त्याच दिवशी सुरू करण्याची शयता आहे. महत्त्वाच्या साक्षीदारामुळे न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाण्याची शयता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील नागरिक, राजकीय नेते आणि कायदा अभ्यासक या सुनावणीकडे उत्सुकतेने पाहत आहेत.