Rain update: एप्रिल महिना सुरू असूनही राज्यात उन्हाऐवजी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळत असून, आता हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भ या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेशच्या दक्षिण भागापासून कर्नाटकपर्यंत सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पावसासोबत 40 ते 45 किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा धोका आहे. गारपीटीची शक्यता लक्षात घेता शेतीचंही मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या भागांमध्ये तापमानाचा पारा ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असला, तरी वातावरणात प्रचंड आर्द्रता असल्यामुळे हवामानात प्रचंड अस्थिरता आहे.
त्यामुळे पावसाचे जोरदार झटके येण्याची शक्यता कायम आहे. राज्यात पावसाचा जोर असताना, मुंबईकर मात्र उकाड्याने हैराण आहेत. पुढील चार ते पाच दिवस उष्म्याची लाट मुंबईत कायम राहणार असून, मळभ कमी झाल्यानंतर उष्णता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. शहरात किमान तापमानात फारसा बदल झालेला नसला तरी उकाडा आणि घामाच्या तक्रारी वाढल्या आहेत.