कान्हूरपठार पतसंस्थेवर व्यक्त केला नातेवाईकांसह ग्रामस्थांनी विश्वास
पारनेर | नगर सह्याद्री
आजारपणात अंथरूणाला खिळून राहिलेला तरुण उपचारानंतर बरा होईल आणि आपल्या कुटुंबाचा आधार होईल असे वाटत असतानाच नियतीने त्या कुटुंबावर घाला घातला आणि तो तरुण दगावला. यानंतर आर्थिक विवंचनेत ते कुुटुंब आले. तरुणाच्या दशक्रिया विधीत लांबलचक श्रद्धांजलीपर भाषणे न ठेवता त्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची भूमिका गावकर्यांनी घेतली. त्यातून दशक्रिया विधीच्या जागीच मोठी रक्कम जमा झाली. जमा झालेली ही रक्कम त्या तरुणाच्या पत्नी आणि मुलांच्या नावे ठेव पावती म्हणून ठेवण्याचा निर्णय नागरिकांसह नातेवाईकांनी घेतला. नातेवाईक, ग्रामस्थांनी मिळून ही रक्कम कान्हूरपठार पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले. सदरची घटना तालुक्यातील कर्जुले हरेश्वर येथे घडली. सकारात्मक भूमिका घेत मदतीचा हात पुढे करण्याची दातृत्वाची भावना गावकर्यांनी आणि नातेवाईकांनी जपल्याबद्दल गावकर्यांच्या भुमिकेचे वेदमुर्ती ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांनी स्वागत केले असून गावकर्यांचे अभिनंदन केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कर्जुले हर्या येथील आंधळे परिवारातील एक तरुण आजारपणाने अंथरुणाला खिळून होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी हॉस्पिटलसह अन्यत्र मोठा खर्च केला. मात्र, तो तरुण आजारपणातून बाहेर पडू शकला नाही. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्याला इहलोकीची यात्रा संपवावी लागली. लहान मुले आणि पत्नी यांना यासह त्याच्या आई- वडिलांना यातून मोठा आघात झाला. उपचारासाठी मोठा खर्च येऊनही कर्ता मुलगा हरपला. त्याचा मोठा आघात या कुटुंबावर झाला. लहान मुलगा- मुली यांचे शिक्षण, त्यांचे संगोपन असे अनेक प्रश्न त्या मुलाच्या पत्नीसह आई- वडिलांसमोर असल्याची जाणिव कर्जुले हरेश्वर येथील गावकर्यांना झाली. तरुणाच्या दशक्रियाविधीच्या निमित्ताने सारेच नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट आणि गावकरी मंडळी जमा झाली होती. सकाळी आठ वाजताच दशक्रिया विधी होता. अत्यंत शोकाकुल वातावरण यानिमित्ताने निर्माण झाले होते.
प्रवचन करणार्या महाराजांनी विवेचन केले आणि काकस्पर्श होण्याची वाट पाहत असतानाच आता श्रद्धांजलीपर भाषणे सुरू होतील असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. या कुटुंबाला शाब्दीक आधारापेक्षा आणि सांत्वनापेक्षा आज आर्थिक मदतीची गरज असल्याचे आणि त्या मदतीतूनच या तरुणाच्या लहान मुुुलगा- मुलीला, पत्नीला आधार मिळणार असून त्यांना सध्यातरी कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नसल्याची भावना व्यक्त केली. लागलीच गावातील तरुणांनी हातात पेन आणि कागद घेतले. भल्या सकाळी दहाव्याला येताना कोणाकडे मोठी रक्कम नक्कीच नसते. मात्र, तरीदेखील उपस्थित महिलांसह नातेवाईक, मित्र, ग्रामस्थांनी खिशात हात घातला. बघता- बघता अवघ्या वीस मिनीटात जवळपास सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम जमा झाली. दातृत्वाची भावना असेल तर दहाव्याच्या जागी देखील ही एवढी मोठी रक्कम जमा होऊ शकते हे कर्जुलेकर ग्रामस्थांनी दाखवनू दिले.
आर्थिक मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात तरुणाचे नातेवाईक, पत्नी, आई-वडिल व निवडक ग्रामस्थ यांची बैठक झाली. या बैठकीत रकमेची मोजदाद करण्यात आल्यानंतर ही रक्कम त्या तरुणाच्या पत्नीकडे देण्याबाबत चर्चा झाली. मात्र, ही रक्कम पत्नी आणि मुलांच्या नावे पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्वांनी संमती दिली आणि सदरची रक्कम कान्हूरपठार पतसंस्थेत दामदुप्पट प्रकारच्या ठेवीत पावती म्हणून ठेवली गेली. गावकर्यांनी आर्थिक अडचणीत असणार्या अशाच प्रकारच्या अनके कुटुंबांना यापूर्वी देखील मदत केली असून त्यातून ही कुटुंब सावरली. गावकर्यांसह नातेवाईकांच्या दातृत्वाच्या भावनेतूनच हे शक्य होत असल्याचे प्रतिपादन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिर्के व सचिव एकनाथ दाते यांनी सांगितले.
आमच्या विश्वासार्हतेची ही पावती ः नमिता ठुबे
ठेवीदार आणि सामान्य जनता यांचा मोठा विश्वास जपण्याचे काम स्व. दिलीपराव ठुबे यांनी केले. तीच परंपरा संस्थेचे पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांनी कायम ठेवली आहे. ठेवीदारांचा विश्वास, प्रामाणिक कर्जदार आणि सभासदांनी संचालक मंडळावर व्यक्त केलेली भूमिका यातून संस्थेच्या चेअरमन श्रीमती सुशिला ठुबे, व्हाईस चेअरमन पी. के. ठुबे आणि संचालक मंडळ काम करत आहे. मालकाच्या भूमिकेत न राहता विश्वस्ताच्या भूमिकेत काम करण्याची स्व. दिलीपराव ठुबे यांनी घालून दिलेले शिकवण आणि पारदर्शी कारभार हीच आमची शिदोरी आहे. त्या शिदोरीतूनच कर्जुलेकर ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी आमच्यावर विश्वास दाखवल्याचे आणि संबंधीत रक्कम ठेव म्हणून ठेवल्याची जाणिव आम्हाला आहे.
ः कु. नमिता दिलीप ठुबे
(कार्यकारी संचालिका, कान्हूरपठार पतसंस्था)