माजी आमदार विजय औटी मैदानात; सुजित झावरे यांची माघार
गणेश जगदाळे / नगर सह्याद्री –
पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून राणीताई निलेश लंके या आहेत. त्यांच्या विरोधात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार काशिनाथ दाते हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती मध्ये सुद्धा बंडाळी झाल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीत जिल्हा परिषद माजी सदस्य व शिवसेना नेते संदेश कार्ले यांनी बंड केलेले आहे. तसेच महायुती बरोबर गेलेले पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनीही आपला अर्ज अपक्ष म्हणून ठेवला आहे. तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार विजय भास्करराव औटी यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात ठेवला आहे. इतरही अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिलेले असल्याने पारनेर नगर विधानसभा मतदार संघात मुख्य लढती मध्ये पंचरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये बंडाळी झाली असल्याने आता निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत आलेली आहे.
विधानसभेच्या रणसंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असून पारनेर नगर विधानसभा मतदार संघात आज आठ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. असून खऱ्या अर्थाने होणाऱ्या लढतींचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत तान्हाजी पठारे यांनी आज सकाळी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट फोन आल्यानंतर त्यांच्या आदेशाचे पालन करत उमेदवारी अर्ज माघारी घेतला असून त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले. त्याच बरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई निलेश लंके यांना पाठिंबा जाहीर केला. आहे तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संपर्क झाल्यानंतर माघारी घेतला असून त्यांनी आपला पाठिंबा अद्याप कोणालाही स्पष्टपणे जाहीर केला नाही ते लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील.