मुंबई / नगर सह्यादी –
प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडून यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसह अनेक मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा बच्चू कडू यांनी घेतला आहे. बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं आहे.
‘कर्जमाफीसाठी मरायलाही तयार आहोत.’, असा कडक इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावेळी साम टीव्हीशी बोलताना बच्चू कडू यांना अश्रू अनावर झाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान बच्चू कडू भावनिक झाले. शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही झटत आहोत असं म्हणताना कडूंच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांच्या या भावनिक क्षणाने आंदोलनात उपस्थित शेतकरीही भावुक झाले. राज्यभरातून या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला. त्यांनी नागपुरात येऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आणि सरकारने मागणी मान्य करावी असं आवाहन केले.
यावेळी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना थेट सरकारला इशारा दिला. त्यांनी सांगितले की, ‘वरचा देव पावला, खालचा देव पावतो का नाही बघू. आंदोलन करतो हे फार म्हत्वाचे आहे. आंदोलन करताना खबरदारी घ्यावे लागते. आपण प्रामाणिक असलो पाहिजे. कर्जमाफीसाठी मरायलाही तयार आहोत. सगळे तयारीचे पठ्ठे झालो. आपण यश घेऊन आलो.’
बच्चू कडू यांनी पुढे सांगितले की, ‘ओबीसी नेत्यांनी यावे अशा अपेक्षा होत्या. नाही आले तरी वाईट नाही. माझा शेतकरी सर्व जातीचा आहे. शेतकरी म्हणून जरांगे आले त्यांचे आभार मानतो. पुढची बैठक घेऊ. उद्या रेलरोको कसे करायचे ते ठरवू. १० मंगल कार्यालयात आंदोलन असेल. उद्या रेलरोकोची दिशा ठरवू. शेतकरी म्हणून सर्व एकत्र यायला मोठं मन पाहिजे. मोठे अनुभवी नेते आज एकत्र आलेत. जरांगे यांनी तसेच शेतकरी नेते एकत्र आले त्यांचे अभार. सर्व शेतकरी नेते एकत्र आले हे मोठं यश आहे.



