spot_img
संपादकीयराऊत साहेब, नगरमधील शिवसेना संपविल्याबद्दल अभिनंदन!; नगरमध्ये राठोडांचा विक्रम अन् गाडेंचा योगी...

राऊत साहेब, नगरमधील शिवसेना संपविल्याबद्दल अभिनंदन!; नगरमध्ये राठोडांचा विक्रम अन् गाडेंचा योगी…

spot_img

सहकार पंढरीच्या जिल्ह्यातील शिवसेना संपली नव्हे संपवली | निवडणुका आल्या की बाळासाहेबांचे सैनिक लढणारे, अशी उपदेशबाजी अन् पडद्याआड उमेदवारी वाटपाच्या सुपार्‍या घेणार्‍या टोळ्या / पक्षप्रमुख ठाकरे की राऊत? साजन पाचपुते नगरमधील एकमेव उपनेता, तो अद्यापही फरारच | राठोडांचा विक्रम अन् गाडेंचा योगी लढत असताना त्यांनाही सोडलेय वार्‍यावर!

सारिपाट / शिवाजी शिर्के
प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी हे आदेशावर काम करत असल्याचे सर्वश्रूत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे फक्त आणि फक्त मातोश्रीतून तोंडी आदेश निघायचे आणि त्या आदेशाची संपूर्ण राज्यात एकाचवेळी अंमलबजावणी व्हायची! सोशल मिडिया येण्याच्या कितीतरी आधीच्या वर्षापासून आदेशावर चालणारी संघटना किंवा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख होती! (होय, होती!) आता ती राहिली नाही असे लिहीण्यापेक्षा ती ओळख संपविण्याचे पाप संजय राऊत यांनी केले की त्यांना तसे करण्यास आणखी कोणी प्रवृत्त केले याचा शोध सध्या सामान्य शिवसैनिक (बाळासाहेब ठाकरे यांचे) घेत आहेत. कारण हा शोध पक्षप्रमुख म्हणून काम करत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला जाऊ शकत नाही. त्यांच्या डोळ्यावर कालही पट्टी होती आणि आज तर ही पट्टी आणखी गडद झालेली दिसतेय! सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात शिवसेना फक्त वाढलीच नाही तर इथल्या अनेक सहकार धुरीणांच्या मानगुटीवर बसून ती वाढली. बाळासाहेब ठाकरे यांची हीच शिवसेना आज गलीतगात्र झालीय! जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी असे सारेच चारीमुंड्या चितपट करण्याची कामगीरी विरोधकांनी केली असती तर ते समजण्यासारखे होते. ही कामगीरीशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बजावली असल्याची जाहीर चर्चा आता शिवसैनिक करू लागले आहेत! त्यातूनच ही सारी मंडळी राऊत यांचे आता अभिनंदन करु लागलीत अन् एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल होऊ लागली आहेत.

लोकसभा निवडणुकीत शिर्डीतून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाने नगरमधील शिवसैनिकांच्या आशा- अपेक्षा वाढल्या! पुढे विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणार्‍या नगर शहर, पारनेर या दोन मतदारसंघात मशाल चिन्ह मिळेल असे वाटत असताना प्रत्यक्षात हे चिन्ह कोणतेही मेरीट नसणार्‍या श्रीगोंदा तालुक्यात गेले. त्यातही ज्यांचा शिवसेनेशी, ठाकरे यांच्या विचारांशी दुरान्वयेही संबंध नव्हता, त्या नागवडेंना उमेदवारी देण्यात आली. त्याआधी जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी दुखावले गेले आणि आश्चर्यचकीत झाले ते शिवसेनेचे उपनेतेपद साजन पाचपुते या युवकाला देण्यावरुन! साजन पाचपुते हे श्रीगोंद्याचे तत्कालीन आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आणि स्व. सदाअण्णा पाचपुते यांचे चिरंजीव! काष्टीचं सरपंचपद अलीकडेच त्यांच्याकडे आले ही त्यांची आणखी एक ओळख! मात्र, हे पद मिळवून देण्यात बबनराव पाचपुते यांच्या समस्त विरोधकांचा सिंहाचा वाटा त्यात राहिला. काष्टी, श्रीगोंदासह अन्य प्रमुख मोठ्या गावांमध्ये चालणारा जुगार- मटका आणि त्याचा मास्टरमाईंड (बीडमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर रुढ झालेला परवलीचा शब्द म्हणजे ङ्गआकाफ) कोण हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. बीडमधल्या आकाला कोणाचे आशीर्वाद आहेत हे जसे लपून राहिलेले नाहीत तसेच श्रीगोंद्याच्या बाबतही बोलले जात आहे.
साजनला उपनेता म्हणून घोषीत केल्यानंतर या साजनने जिल्ह्यात किती आणि कोठे बैठका घेतल्या? दिवसा घेतल्या की रात्री? कोणाच्या उपस्थितीत घेतल्या असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले होते आणि आजही ते उपस्थित होत आहेत. विधानसभा निवडणुकीत नगरची जागा घेतली असती तर सहज जिंकता आली असती अशी भावना शिवसैनिकांमध्ये होती. याशिवाय पारनेरच्याबाबत देखील तीच भावना होती. नगर शहरात तीस- पस्तीस वर्षे आणि पारनेरमध्ये जवळपास १५ वर्षे शिवसेना ठाकरे गटाचा आमदार असताना या दोन्ही जागांवर जागा वाटप बैठकीत उद्धव ठाकरे- संजय राऊत यांनी दावा देखील केला नाही. मात्र, श्रीगोंद्यासाठी हेच संजय राऊत महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीतून निघून गेले! जी जागा प्रतिष्ठेने मिळवली ती जागा मोठ्या मतांनी हरण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार भक्कम बहुमताने आले. केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली. त्यातही नगर शहरातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांमध्ये शहर- प्रभागाच्या विकासासाठी सत्तेत राहावेच लागेल ही भावना वाढीस लागली. स्व. अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर निकालानंतर टाकलेली पोस्ट शिवसेना पदाधिकार्‍यांसह काही नगरसेवकांच्या जिव्हारी लागली. हीच पोस्ट पुढे दुरावा निर्माण होण्यास कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात येताच विक्रम राठोड यांनी ङ्गमाझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नकाफ, अशी भूमिका घेतली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेनेतील काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले. आणखी काही नगरसेवक आणि पदाधिकारी दोन- तीन दिवसात शिंदे सेनेत दाखल होतील. या पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांच्या शिवसेना सोडण्याने ठाकरे गटाचे मोठे नुकसान होणार आहे. ज्यांना जायचे त्यांना निमित्त लागते, त्यांना सत्ता लागते, त्यांचा स्वार्थ जागा झालाय अशी भूमिका घेत जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी त्यांचे कान टोचले आहेत.

याशिवाय त्यांना पक्षाने भरभरुन दिले, महापौर केेले, झेडपीत संधी दिली असे असताना पक्षावर खापर फोडणे चुकीचे असल्याचे मतही गाडे यांनी मांडले! खरे तर गाडे यांनी जबाबदार पदाधिकारी म्हणून भूमिका मांडली असली तरी खासगीत ते देखील पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करतात.
निवडणूका आल्या की आम्हाला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून लढा असे सांगणारे, त्याच निवडणुकांमध्ये आमच्या विरोधकांना ताकद देणार्‍या भूमिका घेतात! दिवसा एक अन् रात्री एक अशी भूमिका घेणार्‍यांमुळे नगरमधील शिवसेना संपली हे वास्तव असल्याचा मतप्रवाह देखील आहे. पक्षाचा प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे असताना अनेकदा संजय राऊत हेच पक्षप्रमुख झालेत की काय अशी शंका येत असल्याची भावना शिवसैनिक व्यक्त करतात.

विधानसभा निवडणुकीनंतर नगर शहरातील एकाही शिवसेना पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवकांना मातोश्रीवरुन ङ्गतू बरा आहेस का, तुला काही अडचण तर नाही नाफ, अशी साधी विचारणा देखील झाली नाही. तुलनेत त्याच महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय पक्षांच्या मुंबईतील नेत्यांनी नगरमध्ये बैठका घेतल्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याची जाणिव करुन दिली. मात्र, शिवसेनेत असे घडले नाही. शिवसेनेची ताकद असणार्‍या पारनेर, नगर शहरातील ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकारी मेलेत कि जिवंत आहेत याची साधी विचारणा देखील गेल्या तीन- चार महिन्यात केली गेली नसल्याचे वास्तव असेल तर नगर जिल्ह्यातील शिवसेना संपली की संपवली या प्रश्नासह ती संपविण्याचे काम करणार्‍या संजय राऊत यांचे अभिनंदन करणारे प्लेक्स झळकल्यास आश्चर्य वाटू नये अशी एका जबाबदार शिवसेना पदाधिकार्‍याने व्यक्त केलेली भावना बरेच काही सांगून जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश...

संतोष देशमुख प्रकरणात शरद पवारांनी उचलले मोठे पाऊल, केले असे…

मुंबई / नगर सह्याद्री - बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राजकीय वातावरणात एकच...

शेवटच्या टोकापर्यंत पाणी कसे मिळेल यासाठी नियोजन करा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले पहा

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी व घोड कालवा सल्लागार समितीची बैठक...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा नगर पंचायत समितीवर डोळा; पहा पडद्याआड काय घडतंय…

नगर तालुका महाविकास आघाडीतील नाराजी भाजपाच्या पथ्यावर | ...तर भाजपा स्वबळावर सुनील चोभे | नगर...