तिरंगी-चौरंगी लढतीची शक्यता
गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहे. पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राणीताई निलेश लंके यांचे नाव अंतिम मानले जात असून महायुतीकडून अजूनही एकमत झालेले नाही. त्यांच्यात एकमत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
महायुतीकडून पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असल्याचे दिसून येत असून या मतदारसंघात चार दिवसापूव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेळावा घेत खासदार निलेश लंके यांच्या विरोधात मोठे शक्ती प्रदर्शन केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या व्यासपीठावर तब्बल चार जण इच्छुक होते. त्यामध्ये बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, उद्योजक माधवराव लामखडे हे व्यासपीठावर होते. यांनी एकत्रित पारनेर येथे अजित पवार यांचा मेळावा घेतला. परंतु मेळाव्यात नियोजनामध्ये भिन्नता दिसून आली.
पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांचे तालुक्यात स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु खासदार नीलेश लंके गटाच्या विरोधात राष्ट्रवादीकडून राणीताई लंके यांच्या विरोधात एकच उमेदवार दिला गेला तर निवडणूक ही अटीतटीची होवू शकते. खासदार नीलेश लंके यांनी आपल्या घरातच पत्नी राणीताईं लंके यांना उमेदवारी घेतल्यास मतदारांमधून नाराजीचा सूर निघू शकतो. त्यामुळे विरोधातील उमेदवाराला मोठा फायदा होऊ शकतो. परंतु विरोधकांचे स्वतंत्र अस्तित्व असल्याने त्यांच्यात एकमत करून एकच उमेदवार राणीताई लंके यांच्या विरोधात उभा केल्यास निवडणूक मध्ये रंगत येण्याची शक्यता आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विरोधकांमध्ये एकमत दिसत नाही.
यामध्ये काशिनाथ दाते व सुजित झावरे एकमेकांना पूवपासूनच विरोधक समजत आले आहेत. 2014 ला सुजित झावरे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तरीही माधवराव लामखडे यांनी बंडखोरी केली होती. माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या मागे युवकांचे मोठे संघटन असल्याने त्यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दुरंगी लढत लंके यांची डोकेदुख ठरु शकते. तसेच उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुकध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघ हा पुरोगामी विचाराचा मतदार संघ आहे येथे प्रस्थापित विचारसरणीला कधीच पाठबळ मिळालेले आजपर्यंत तरी दिसून आलेले नाही. विरोधकांमध्ये एकमत न झाल्यास पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील निवडणक तिरंगी, चौरंगी होवू शकते. महायुतीकडून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.