पारनेर । नगर सहयाद्री:-
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे विद्यमान सदस्य तथा भाजपाचे २२४ पारनेर-नगर विधानसभा निवडणुक प्रमुख श्री विश्वनाथ दादा कोरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पारनेर तालुक्यातील अनेक गावांत विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून नागेश्वराची पावन भुमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील भाळवणी येथे विश्वनाथ दादा कोरडे युवा मंचच्या वतीने शिवशक्ती मंगल कार्यालय भाळवणी येथे २९ ऑगस्ट २०२४ रोजी खेळ रंगला पैठणीचा या श्रावण मंगळागौर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमाला परीसरातील महीला भगिणींनी उच्चांकी उपस्थिती दर्शवत भरभरुन प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ दादा कोरडेंसमवेत शिवसेना तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, अहिल्यानगर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व भाळवणी गटाचे नेते सुभाषजी दुधाडे, विश्वनाथ दादा कोरडे युवा मंचचे क्रियाशील सदस्य सोपानराव मुंजाळ, पोपटराव लोंढे, रघुनाथजी रोहोकले यांच्यासह भाळवणी गावच्या लोकनियुक्त सरपंच लिलाताई रोहोकले, पारनेर भाजपाच्या महीला अध्यक्षा सोनालीताई सालके, पुजाताई विश्वनाथ कोरडे, भाजपच्या माजी महीला जिल्हा उपाध्यक्षा वैजंताताई दुधाडे व भाळवणी परीसरातील हजारोंच्या संख्येने महीला भगिनी उपस्थित होत्या. खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमादरम्यान सहभागी झालेल्या २५० हुन अधिक महीलांना एल सी डी टिव्ही, गॅस शेगडी, मिक्सर, टेबल फॅन व इस्त्री यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
सरकारच्या माध्यमातून महीला सक्षमीकरणावर कितीही भर देण्यात येत असला तरी प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील महीलांची कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना मोठ्या प्रमाणात ओढाताण होत असते. विविध जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांच्या होत असलेल्या कुचंबणेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत असलेला तणाव लक्षात घेऊन राजकारणातील, समाजकारणातील एक जबाबदार घटक म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर एक दिवसासाठी का होईना आपल्या माध्यमातून हसू फुलाव, एक दिवसासाठी का होईना पण त्यांनी या कौटुंबिक विवंचनेतुन बाहेर पडावं, परस्पर भेटीगाठींत त्यांनी रममाण व्हावं, त्यांच्या विचारांची परस्पर देवाण-घेवाण वृद्धिंगत व्हावी हा एकमेव उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून विश्वनाथ दादा कोरडे युवा मंचच्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगत भाळवणी व परीसरातुन या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहीलेल्या सर्व माताभगिनींचे श्री विश्वनाथ दादा कोरडे यांनी यावेळी आभारही व्यक्त केले.
माय-माऊल्यांच्या मनात दाटलेलं समाधान, त्यांच्या चेहऱ्यावरील स्पष्टपणे जाणवणार खळाळत हास्य पाहून श्री कोरडे यांनी आजवर महीला-भगिनींचा विचार करून पारनेर भाजपा, अंजना सोशल फाउंडेशन व विश्वनाथ दादा कोरडे युवा मंचच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांप्रमाणेच यापुढील काळातही तालुक्यातील महीलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी वा महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक स्वरूपात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही सांगितले. युवा मंचच्या वतीने कोरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेल्या या यशस्वी कार्यक्रमाबद्दल उपस्थित असलेल्या महीलांनी समाधान व्यक्त करत श्री. विश्वनाथ दादा कोरडे यांच्यावर पुढील आयुष्यासाठी आशिर्वाद व शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.