अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिल्यांदा शिवसेनेन आमदार केलं. पहिल्याच टर्मला त्यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये स्व. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रीपदाची संधी दिली. त्यांच्या कुटुंबात केंद्रीय उद्योग, अर्थराज्यमंत्री पद देखील दिलं. आभाळा एवढे उपकार करून देखील विखे पाटलांनी मात्र ठाकरेंचं मीठ खाऊन मातोश्रीशी गद्दारी केली. त्यांनी शिवसेनेच्या अस्तित्वाची चिंता करु नये अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे.
मंत्री विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर शहर शिवसेनेने पलटवार केला आहे. काळे म्हणाले, विखे पाटलांनी शिवसेनेच्या अस्तित्वाची चिंता करू नये. तुमच्या सारख्यांना पहिल्यांदा मंत्रिपद देऊन शिवसेनेनं तुम्हाला राज्यभर अस्तित्व निर्माण करून दिलं. ज्यांच्यामुळे तुमच अस्तित्व निर्माण झाल त्यांच्या अस्तित्वावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. यापेक्षा तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्या. पालकमंत्री पद हे केवळ राजकीय कुरघोड्या करण्या करिता वापरण्या ऐवजी विकास कामांकरिता वापरा, असा खोचक सल्ला काळे यांनी दिला आहे.
दरम्यान, शिर्डी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना माजी मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे, खा. संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना किरण काळे म्हणाले, राणे आणि त्यांची दोन वाचाळवीर मुलं हे महाराष्ट्रासाठी मनोरंजनाचा विषय आहेत. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. शिवसेना नेते खा. संजय राऊत हे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आहेत.
तुमच्या हुकूमशाही सरकारने खा.राऊत यांना तब्बल शंभर दिवस मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात डांबण्याचा पाप केलं. त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून बनावट कारवाई करून छळ केला. मात्र मुंबईच्या पीएमएलए कोर्टान राऊत यांना जामीन मंजूर करताना त्यांची अटक बेकायदा आणि विनाकारण असल्याच स्पष्ट केल आहे. एवढ होऊन देखील राऊत यांनी सरकारच्या दडपशाही समोर गुडघे टेकून पक्ष सोडण्याची गद्दारी केली नाही. राणे यांची ठाकरे, राऊत यांच्यावर टीका करण्याची औकात नाही, असे काळे यांनी म्हटले आहे.