अहमदनगर | नगर सह्याद्री:-
सावेडी उपनगरातील पाईपलाइन रस्त्यावरील एका फोटोग्राफीच्या दुकानातून परप्रांतीय कामगाराने कॅमेरा, लेन्स, बॅटरी असा दोन लाख १० हजाराचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ऋषिकेश मच्छिंद्र लोखंडे (वय २६ रा. भारत पेट्रोलपंपा शेजारी, पाईपलाइन रस्ता, सावेडी) यांनी काल, सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित साहू (मुळ रा. शक्तिनगर, दुर्ग, छत्तीसगढ) असे गुन्हा दाखल झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. ऋषिकेश यांचे पाईपलाइन रस्त्यावर द ऋषी स्टुडिओ नावाचे फोटोग्राफीचे दुकान आहे. त्या दुकानात रोहित साहू १५ दिवसापासून कामाला होता. ऋषिकेश हे १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजता तिरूपती बालाजी (आंध्र प्रदेश) येथे देवदर्शनासाठी गेले होते.
ते तेथे असताना त्यांनी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता रोहित साहू याला फोन लावला असता त्याचा फोन बंद होता. त्यांनी मित्र संकेत बोरूडे यांना फोन करून दुकानावर जाण्यास सांगितले. संकेत यांनी दुकानावर जावून पाहिले असता त्यांना दुकान बंद असल्याचे व दुकानाची चावी बाहेर पडलेली असल्याचे दिसले. तशी माहिती त्यांनी ऋषीकेश यांना दिली. ऋषिकेश तिरूपती बालाजी येथून १८ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता नगरला आले.
त्यांनी दुकानात जावून पाहणी केली असता एक लाखाचा एक कॅमेरा, ९० हजाराच्या तीन लेन्स, १० हजाराच्या दोन बॅटर्या व १० हजाराची एक लाईट असा दोन लाख १० हजाराचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी काल, १९ ऑगस्ट रोजी दुपारी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित साहू विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.