कोपरगाव | नगर सह्याद्री
किरकोळ कारणावरून कोपरगाव शहरात दोन गटात तुंबळ राडा झाल्याची घटना रात्री घडली आहे. या घटने दोन्ही गट आमनेसामने आल्याने हाणामारी व एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागात रात्रीच्या सुमारास हा वाद उद्भवला होता. किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केल्याची माहिती समोर येत आहे. नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला.
आमदार पीएसह नगरसेवकाचा समावेश
सदरच्या प्रकरणात संबंधित दोन्ही गटातील ६३ जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूच्या १६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्विय सहाय्यक यांच्यावर आणि मनसेच्या शहरप्रमुखावर देखील गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.



