अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या वादातून राडा झाला. याप्रकणी दोन्ही गटांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रर नोंदवली आहे. निलेश बाळासाहेब शिंदे (वय ३१, रा. अरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादित फिर्यादी व त्यांचा भाऊ नितीन हे रविवारी (दि. ९) दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात काम करत होते. यावेळी आरोपींनी बांधावर टाकलेले गवत फिर्यादीच्या शेतात परत फेकले.
शेताच्या बांधावर टाकलेले गवत परत शेतात का टाकले, एवढ्या क्षुल्लक कारणाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील तिघा आरोपींनी फिर्यादी, त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना बेदम मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी संपत बापु शिंदे, संभाजी संपत शिंदे, आणि अंबादास संपत शिंदे (सर्व रा. शिंदे मळा, अरणगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर विरोधी फिर्याद संभाजी संपत शिंदे (वय ३१, रा. अरणगाव) यांनी दिली. फिर्यादी यांचे वडील संपत बापू शिंदे ०९ नोव्हेंबर रोजी दुपारी अरणगाव येथील शिंदे मळा शिवारात काम करत होते.
यावेळी याच परिसरात राहणारे आरोपी नितीन बाळासाहेब शिंदे, निलेश बाळासाहेब शिंदे आणि बाळासाहेब भाऊसाहेब शिंदे हे तिघे जण तेथे आले. आरोपींनी फिर्यादीचे वडील संपत शिंदे यांना तुमच्या बांधावरील शेततळे काढून घ्या, या कारणावरून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरू असताना फिर्यादी संभाजी शिंदे हे तेथे आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून, पोलिसांनी नितीन शिंदे, निलेश शिंदे आणि बाळासाहेब शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.



