Ladki Bahin Yojana: राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी जाहीर केले आहे की, जुलै महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ९ ऑगस्ट, रक्षाबंधनाच्या दिवशी जमा केला जाणार आहे.
मंत्री तटकरेंनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, “माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस १५०० रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
महिलांनी रक्षाबंधनाच्या दिवशी निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती आणि आता त्याबाबत अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. योजनेच्या जुलै महिन्याचा निधी वितरीत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांना सध्या फक्त जुलैचा हप्ता मिळणार आहे. पुढील ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.