मुंबई । नगर सहयाद्री :-
राज्यात त्रिभाषा सूत्राविरोधात निर्माण झालेल्या वातावरणानंतर आज मुंबईत वरळी डोम येथे ‘विजयी मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक पक्षांनी व संघटनांनी पहिलीपासून हिंदी अनिवार्य नको, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मनसेने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) देखील आंदोलनाचस इशारा दिला होता.
आज, ५ जुलै रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रावरील दोन्ही अध्यादेश मागे घेतले, आणि नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि त्याऐवजी ‘विजयी मेळावा’ आयोजित करण्यात आला. वरळी डोम येथे होणाऱ्या या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची ही महत्त्वाची वेळ असून, अनेक वर्षांनंतर दोघे एकाच मंचावर उभे राहणार असल्याने हा मेळावा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय भूमिका मांडतात, पुढील राजकीय संकेत काय मिळतात, याकडे राज्यातील जनतेसह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे