Weather Update: बंगालच्या उपसागरात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे राहणार असून आज मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील हवामान सध्या ढगाळ व दमट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून तापमानातही वाढ झाली आहे. IMD ने आज बुधवारी राज्यात मध्य महाराष्ट्र व कोकणात सिंधूदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळाने सध्या कर्नाटकाच्या सागरी भागासह अरबी समुद्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा दाब दोन दिवसात येत्या दोन दिवसात पुढे सरकणार असून हळूहळू कमकुवत होणार आहे. त्यामुळे तळकोकणातील जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता राहणार असून आज कोल्हापूर घाट परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुणे,सातारा, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यात लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींसह वादळी वारेही वाहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस म्हणजेच 5 व 6 डिसेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र तसेच तळ कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन दमट हवामान झालं आहे. तर दोन दिवसापूर्वी तापामनात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने तळकोकणातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणासह गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.