पुणे | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. गावात पाणी शिरल्यामुळे शेकडो नागरिकांना स्थलांतर करावे लागले. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र विदर्भातही पावसाने थैमान घातल्याचे चित्र होते.
आता बहुतांश भागात पाऊस ओसरला असला तरी पुढील चार दिवस विदर्भ मराठवाड्यासह तळ कोकणात काही जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.अहिल्यानगरमध्ये पुढील तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस सांगितला आहे. त्यानंतर दोन दिवस यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान विभागाने दिले आहेत. 3 ऑक्टोबरपर्यंत पावसाचे अंदाज देण्यात आले असून पुन्हा विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाजानुसार, पुढील सहा दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज (30 सप्टेंबर) रोजी नांदेड वगळता कुठल्याही जिल्ह्याला पावसाची शक्यता नाही. पण उद्यापासून मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.