मुंबई | नगर सह्याद्री
गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार (25 ऑगस्ट) सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाहेर पडण्यापूव नागरिकांनी हवामान अपडेट तपासण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले आणि सांताक्रुझ या परिसरात पहाटेपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 10-15 मिनिटांपासून या भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जर असाच पाऊस काही काळ सुरू राहिला, तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू असून, सध्या तिथे पाऊस थांबला आहे. नवी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे.
हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 26 आणि 27 ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींसह अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल. वाऱ्याचा वेग 25-30 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्राला भरती येण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.