Maharashtra Rain Update: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, 25 आणि 26 जुलै रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नाशिकच्या घाट भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट), सातारा (घाट), कोल्हापूर (घाट) आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये आज (25 जुलै) अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गडचिरोलीत रेड अलर्टसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही अतिवृष्टीचा इशारा आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरसाठी येलो/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहील. किनारपट्टीवर 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश आहेत.
चंद्रपूर-भंडाऱ्यात जोरदार पाऊस
विदर्भात गेल्या 48 तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांत रेड अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
.