मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 13 ते 16 ऑगस्टदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पुढील काही तासांत जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सोलापुरातही रात्रीपासून पावसाचा मारा सुरू आहे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईच्या काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर शहरात मागील तासाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून सोलापुरात दिवसभर ऊन आणि रात्री मुसळधार पावसाची स्थिती आहे. काल रात्री 12 नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली, ज्यामुळे शहरातील वातावरणात बदल झाला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
14 ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट : वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली
-यलो अलर्ट : अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, संपूर्ण कोकणपट्टी
15 ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट : रत्नागिरी, सातारा घाटमाथा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली
यलो अलर्ट : रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सिंधुदुर्ग, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर
16 ऑगस्ट
ऑरेंज अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, बुलढाणा, अकोला, अमरावती
यलो अलर्ट : मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, नाशिक घाटमाथा, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, सिंधुदुर्ग
पावसाचा जोर कायम
IMDच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाचा जोर कायम राहील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 13 ते 15 ऑगस्टदरम्यान पावसाची तीव्रता वाढेल, तर मराठवाड्यात 14 आणि 15 ऑगस्टला जोरदार पाऊस अपेक्षित आहे. विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.